बौद्धिक संपदेबाबत जागरुकता निर्माण करून संशोधकांना त्यांचा हक्क मिळण्यास हातभार लावण्यासाठी देशातील एकमेव राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन दोन-तीन दिवसांचे क्रॅश कोर्स चालवून बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडवित आहे.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील दादाजी खोब्रागडे यांच्या संशोधक वृत्तीतून मिळालेले भाताचेएचएमटी वाण आणि पाटणा येथील शालिनीकुमार या शाळकरी मुलीच्या कल्पकतेून साकारलेले पायऱ्या चढणारे वॉकर. ही त्यांची बौद्धिक संपदा आहे. शालिनीकुमार स्पर्धेतून आल्याने त्याचे श्रेय तिला योग्य वेळी मिळाले, पण खोब्रागडे यांना बौद्धिक संपदा नावाच्या प्रकाराची कल्पना नसल्याने अनेक वर्षे त्यांना ओळख मिळाली नाही. देशात अशाप्रकारचे हजारो संशोधन होत आहेत, परंतु या विषयीच्या अज्ञानामुळे खऱ्या संशोधनाला ओळख आणि आर्थिक लाभापासून वंचित राहावे लागत आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दर मिनिटाला नवे तंत्र विकसित होत आहे. यामुळे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्याला त्याचा हक्क मिळावा, बौद्धिक संपदा काय आहे, त्याची नोंदणी, त्याच्या कायदेशीर बाजू, आर्थिक लाभ, यांची र्सवकष माहिती देण्यासाठी देशात बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था स्थापन करण्याचा निर्णय झाला. भौगोलिकदृष्टय़ा देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपुरात ही संस्था स्थापन करण्यात आली. यासाठी २७ कोटी ४२ लाख रुपये गुंतवण्यात आले. भव्य इमारत बांधून जुलै २०१२ला उद्घाटनही झाले, पण केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या लालफितशाहीमुळे गेल्या तीन वर्षांपासून दीर्घकालीन अभ्यासक्रमाची वानवा असून, राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्थेची इमारत सिव्हिल लाईन्सची शोभा वाढवत आहे.
संस्थेचा मूळ हेतू बौद्धिक संपदा व्यवस्थापनविषयक पदवी आणि पदविका अभ्यास सुरू करण्याचा होता, परंतु बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्थेत व्याख्यात्यांसह सगळ्या अद्ययावत सोयी-सुविधा असतानाही ते अभ्यासक्रम सुरू झालेले नाहीत. यामुळे नावापुरती प्रशिक्षण संस्था उरली आहे.
येथे केवळ एक, दोन, तीन दिवसांचे अल्प मुदतीचे अभ्यासक राबविण्यात येत आहेत.
जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी र्सवकष संस्था असावी, अशी कल्पना होती. खेडय़ापाडय़ात, शाळकरी मुले, अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी अनेक शोध लावत असतात, परंतु जाणीव नसल्याने त्यांच्याकडून पेटेंट केले जात नाही. देशातील नागरिकांमध्ये बौद्धिक संपदा आणि ते हक्क कसे मिळवयाचे, याचे ज्ञान देण्यासाठी नागपुरात संस्था उभारण्यात आली, परंतु तीन दिवसांची जागरुकता कार्यशाळा घेण्यापलिकडे काहीच झालेले नाही.
तंत्रज्ञान निर्माण करणारा आणि हे तंत्रज्ञान ज्याला वापरायचे आहे त्याच्यात या संस्थेने दुवा होणे अपेक्षित आहे. संस्थेच्या संकल्पनेनुसार अभ्यासक्रम राबविण्यासाठी नागपूर विद्यापीठ आणि व्हीएनआयटीसारख्या संस्थांसोबत करार करायला हवे होते. येथे पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू झाल्याशिवाय संस्थेचा उद्देश सफल होणार नाही. या संस्थेचा दर्जा थिंट टँकचा आहे. देशभरात वेगवेगळ्या बौद्धिक संपदांविषयीचे प्रशिक्षण देण्यासाठी, ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संस्था उघडणे अपेक्षित आहे, परंतु केवळ इमारत झाली आणि पण उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे पावले पडलेली नाहीत, असे नीतिमत्ता आश्वासन केंद्राचे संजीव तारे म्हणाले.