मीटरच्या छायाचित्राशिवाय ७ ते ११ हजारांची वीजदेयके

ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचा दावा करणाऱ्या महावितरण प्रशासनाकडून दिव्यातील सामान्य नागरिकांची अक्षरश: लूट केली जात असून या भागातील नागरिकांना मीटरचे छायाचित्र न देता हजारो रुपयांची देयके देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महावितरणच्या कार्यालयात तक्रार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ५० टक्के रक्कम कमी करून देयके भरण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिक हवालदिल झाले आहे. महावितरणच्या या मनमानी कारभारामुळे येथील नागरिकांसमोर संताप करण्याव्यतिरिक्त पर्याय उपलब्ध राहिलेला नाही. तक्रार करणाऱ्या नागरिकांनाही आधी पैसे भरा, नंतर तक्रार ऐकून घेतली जाईल, असे सांगितले जाते.

दिव्यातील मुंब्रा देवी रोडवर लक्ष्मी चौथे अपार्टमेंटमध्ये मोहन गरुडे भाडय़ाच्या घरामध्ये राहतात. टिटवाळ्याच्या गणेश मंदिरामध्ये सहस्रनाम अवर्तन आणि दैनंदिन पूजा अशी कामे करणारे गरुडे यांचा छोटासा संसार या घरामध्ये सामावला आहे. चार एलईडी बल्ब, दोन फॅन, फ्रिज, टी.व्ही. असा मर्यादित स्वरूपाचा विजेचा वापर असताना त्यांच्या हाती फेब्रुवारीमध्ये चक्क ११ हजार ६९० रुपये इतके वीज देयक आले. इतके देयक कसे भरणार, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. त्यांनी या प्रकरणी दिव्यातील महावितरणचे कार्यालय गाठले; परंतु तेथेही अधिकाऱ्यांनी त्यांना दाद दिली नाही. एका कार्यकारी अभियंत्याने त्यांनी दिलेला अर्जही न स्वीकारता देयकावर पाच हजारांची रक्कम भरण्याचे लिहून देऊन हे पैसे भरा असे आदेशही दिले. त्यामुळे नाइलाजाने त्यांनी ही रक्कम भरून महावितरणकडे मीटरची तक्रार केली. त्यावर तुमचा मीटर व्यवस्थित आहे. आमच्या यंत्रणेमध्ये दोष असून तो दूर करून तुम्हाला योग्य बिल पुढील आठवडय़ात देण्याचा दावा करण्यात आला. मात्र पुढील महिन्यातही त्यांना ६ हजार रुपये बिल आले.

त्यानंतर मे महिन्याचे वीज देयक ८ हजारांच्या आसपास आले. यापुढे तक्रारी करूनही देयकांची रक्कम कमी होत नसून मीटरही बदलला जात नसल्यामुळे गरुडे यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असून या प्रकरणी ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याच्या प्रयत्नात ते आहेत.

तांत्रिक बाबी तपासून उपाय काढू..

दिव्यातील बहुतांश ग्राहकांचे मीटर हे घराच्या आतमध्ये असल्याने मीटरचे रीडिंग घेण्यात अडचणी येतात. तरीही याबाबत मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीला सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ही अडचण सोडवण्याच्या दृष्टीने ग्राहकांच्या घरातील मीटर बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. फॉल्टी मीटर म्हणजेच बिघाड झालेले मीटर बदलण्यात येत आहेत तसेच मल्टी मीटर बॉक्सची योजना ही राबवण्यात येत असल्याची माहिती ठाणे विभाग ३ च्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.

दिवा शहरातील अशा अनेक कुटुंबांना महावितरणकडून फॉल्टी मीटर दाखवून देयके येत आहेत. त्यावर मीटर क्रमांक असतो, परंतु मीटरचा फोटो मात्र नसतो. त्यामुळे अवाच्या सवा देयके ग्राहकांना भरावी लागतात. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारीही यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.

मोहन गरुडे, नागरिक