नदीकिनारी २०३ एकर जागेवर ‘सिंगापूर’च्या धर्तीवर शहराची आखणी

अनधिकृत बांधकामे, अस्वच्छता, रस्त्यांची दुर्दशा अशा अवस्थेमुळे बकाल अवस्थेत असलेल्या कल्याण शहराला लाजवेल, असे नवे कल्याण शहर वसवण्याची महत्त्वाकांक्षी योजना कल्याण-डोंबिवली महापालिकेने आखली आहे. उल्हास नदीच्या किनाऱ्यावरील २०३ एकर भूभागावर अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे ‘नवीन कल्याण’ विकसित करण्यासाठी महापालिकेने प्रकल्प आराखडा तयार केला आहे. सिंगापूरच्या धर्तीवर या शहराची आखणी करण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतील ‘स्मार्ट सिटी’साठी हा पथदर्शी प्रकल्प असेल, असा दावा करण्यात येत आहे.

कल्याण-डोंबिवली शहरे दलदल, वाहतूक कोंडीच्या गजबजाटाने बरबटून गेली आहेत. चालायला चांगले रस्ते नाहीत, वाहनतळ, उद्याने, मनोरंजनासाठीच्या सुविधा नाहीत. त्यामुळे ही शहरे नेहमीच बकाल शहरांच्या यादीत अग्रक्रमावर असतात. हीच ओळख पुसून काढण्यासाठी उल्हास नदीच्या किनाऱ्याजवळील भूभागात शहर उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने केला आहे. पालिकेच्या नगररचना विभागाने ‘ए क्युब’ आर्किटेक्ट संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. उल्हास नदी किनाऱ्याजवळील उंबर्डे गाव, आधारवाडी, नाशिक महामार्ग, वाडेघर या भौगोलिक चतु:सीमेवर सुमारे २०३ एकर जागेत मानवी चेहऱ्याच्या आकारात हे शहर विकसित करण्याचा पालिकेचा मनसुबा आहे. या आराखडय़ाचे सादरीकरण राज्याच्या नगरविकास विभागाकडे करण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रकल्पासाठी अत्यावश्यक मंजुऱ्या आणि निधी मिळविण्याची प्रक्रिया पालिकेकडून करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

शहराची रचना

  • नवीन कल्याणच्या एका बाजूला अर्धगोलाकार खाडीकिनारा आहे. या किनाऱ्याचा शहराच्या सौंदर्यीकरणासाठी उपयोग करून घेण्यात येणार आहे.
  • मध्यवर्ती ठिकाणी भव्य उद्यान विकसित करण्यात येणार आहे. एके ठिकाणी बसल्यानंतर संपूर्ण शहराचा नजारा नजरेत भरेल अशी आखणी रस्ते, इमारतींची करण्यात येणार आहे.
  • खाडीकिनारची उजाड जमीन विकसित करून तेथे लहान तळी, कारंजे बांधण्यात येणार आहेत. शहरातून बाहेर पडण्यासाठी मुख्य चार व सेवा रस्त्यावरून चार अशा मार्गाची रचना करण्यात येणार आहे.
  • नवीन कल्याणमध्ये ३ ते २९ माळ्यांच्या नऊ प्रकारांतील देखण्या इमारती बांधण्यात येणार आहेत.
  • ७ लाख ५८ हजार ६८७ चौरस मीटर (८१ लाख ४० हजार चौरस फूट- २०३ एकर) भौगोलिक क्षेत्र या पथदर्शी प्रकल्पासाठी उपयोगात आणण्यात येणार आहे.

सोयीसुविधा

  • सीटी बिझनेस सेंटर
  • मॉल्स
  • मनोरंजन नगरी, उद्याने
  • शहरात मुख्य रस्ते, अंतर्गत सेवा रस्ते आणि मुख्य चौक
  • व्यापारी, गृहसंकुलांच्या जागेत वाहनतळ
  • सार्वजनिक वाहनतळ
  • रुग्णालये
  • विकसित केलेले हवेशीर ठिकाण
  • शहराच्या प्रवेशद्वारावर आदर्शवत भव्य स्वागत स्तंभ
  • शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी