पावसाचा जोर वाढल्याने महावितरणच्या तांत्रिक बिघाडाच्या घटना वाढल्या असून दिवा शहराला याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून दिवा शहरात दररोज १० ते १२ तास वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. विशेष म्हणजे याविषयी तक्रार करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात दूरध्वनी केल्यास त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे दिवावासीयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून या त्रासामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दिवा पूर्व, आगासन आणि मुंब्य्राच्या काही भागाला याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. ठाण्यातील मध्यवर्ती भागांमध्येही वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे वीज ग्राहकांना मोठा मनस्ताप होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस सुरू झाल्यानंतर दिव्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू झाले. १२ तासांच्या वीज बंदमुळे नागरिकांना दैनंदिन कामेसुद्धा पूर्ण करता येत नाहीत. पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे, तर शालेय मुलांना वीज नसल्याने अंधारात अभ्यास करावा लागत आहे. या प्रकरणी दिवा महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तेथील दूरध्वनी बंद होते, तर पावसाळ्यामध्ये वाहिन्यांमधून वीज प्रवाहित होऊन अपघात होत असल्याने  वीजपुरवठा खंडित राहतो, तर अनेक वेळा दक्षता म्हणून वीजपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

वीज नसल्याने परिसरामध्ये पाणी येत नाही. त्यामुळे महिला वर्गाला स्वयंपाकासाठी पाणी मिळवण्यासाठी वणवण करावी लागते. शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विजेची आवश्यकता असताना रात्रीबेरात्री वीज जाण्याचा विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागतो. त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांनाही दिवसातून १२ तास वीज बंदचा सामना करावा लागत असल्याने त्यांचे दैनंदिन व्यवहार खोळंबून जात आहेत.

– विजय भोईर, दिव्यातील रहिवासी