स्काडा सेंटरच्या माध्यमातून संगणकाद्वारे दुरुस्ती ; ठाणे आणि कल्याणमधील ८० उपविभागांवर ‘ऑनलाइन’ देखरेख
तांत्रिक दोषामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी ग्राहकांना तासन्तास वाट पाहावी लागते. यातही बराचसा वेळ बिघाड शोधण्यासाठी आणि महावितरणचे कर्मचारी येऊन तो दुरुस्त होण्यातच खर्च होतो. मात्र अशा खेळखंडोबातून लवकरच वीजग्राहकांची सुटका होणार आहे. एकाच नियंत्रण कक्षातून भांडुप आणि कल्याण परिमंडळातील ८० उपकेंद्रांची देखरेख तसेच दुरुस्ती हाताळणारे ‘स्काडा सेंटर’ मार्चपासून कार्यान्वित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून कोणत्याही परिसरातील वीज उपकेंद्रातील बिघाड स्वयंचलित यंत्रणेच्या साह्याने दुरुस्त करता येणार आहे.
महावितरणच्या वीज वाहिन्यांमध्ये तसेच संयंत्रात (फीडर) किंवा अन्य काही तांत्रिक बिघाड झाल्यानंतर हा बिघाड शोधण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक वेळ जात होता. बिघाड शोधून संबंधित ठिकाणी पोहोचणे आणि दुरुस्ती काम सुरू करण्यात बराचसा वेळ खर्ची पडत असे. या पाश्र्वभूमीवर महावितरणने भांडुप आणि कल्याण परिमंडळातील ८० उपकेंद्रे ऑनलाइन पद्धतीने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही उपकेंद्रे भांडुप परिमंडळाच्या मुख्यालयात उभारण्यात येणाऱ्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहेत. या उपकेंद्रांमध्ये कोणताही दोष निर्माण झाल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्षातील पडद्यावर दिसेल. त्यानंतर तेथूनच स्वयंचलित यंत्रणेच्या मदतीने हा बिघाड दुरुस्त करण्यात येईल. ‘हे काम अंतिम टप्प्यात आले असून मार्चपर्यंत ही यंत्रणा म्हणजे ‘स्काडा सेंटर’ पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकणार आहे,’ अशी माहिती भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी दिली. या कामासाठी १५० कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद आहे. त्यामध्ये भांडुप परिमंडळातील ५५ तर कल्याण परिमंडळातील २२ उपकेंद्रांचा समावेश आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून ‘स्काडा सेंटर’च्या पडद्यावर संपूर्ण यंत्रणेचा नकाशा उपलब्ध होतो. ज्या ठिकाणी बिघाड उत्पन्न झाला आहे. त्याची माहिती लक्षात घेऊन त्या ठिकाणची दुरुस्ती करता येणार आहे. कर्मचाऱ्यांवरील ताण यामुळे कमी होईल. तात्काळ सेवा देण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. ज्या दुरुस्तीसाठी अर्धा ते एक तास लागत होता, ही दुरुस्ती अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे, अशी माहिती सतीश करपे यांनी दिली.

स्काडा सेंटर म्हणजे काय?
’प्रत्येक उपकेंद्राची सद्य:स्थिती, तेथील विजेचा भार, विजेच्या मागणी नुसार होणारा पुरवठा याची सगळ्याची इत्थंभूत माहिती ‘स्काडा सेंटर’च्या नियंत्रण कक्षेतून मिळते.
’बिघाड झालेल्या उपकेंद्रातील वीजपुरवठा बंद ठेवून अन्य भागात सुरळीत वीज देणे या गोष्टीसुद्धा या यंत्रणेच्या माध्यमातून मिळू शकतील.
’रिलायन्सच्या तांत्रिक सहकार्याने हे केंद्र काम करत असून अमरावती आणि भांडुपमध्ये ही यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.