राजकीय दबावामुळे खाडीकिनाऱ्यावरील अतिक्रमणांना अभय
ठाणे जिल्ह्य़ातील वाळूतस्कर आणि खाडीकिनारा संरक्षित क्षेत्रात अतिक्रमणे करणारे भूमाफिया यांचे कंबरडे मोडणाऱ्या तात्कालिक जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची कळव्याच्या खाडीकिनारी चौपाटी उभारण्याची योजना भाजप सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याच्या दबावामुळे बारगळल्याचे उघड झाले आहे. डॉ. जोशी यांनी खाडीकिनारी असलेली सुमारे ७५० अतिक्रमणे हटवण्यासाठी तीनदा मोहिमाही आखल्या. परंतु या मंत्र्याने मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरून ही कारवाई रोखल्याचीही माहिती मिळत आहे. आता जोशी यांच्या जागी नियुक्त झालेले नवीन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनीही ही योजना पुढे नेण्यासाठी गुरुवारी या भागाची पाहणी केली. परंतु ठाणे जिल्ह्य़ातील एका राजकीय नेत्याने पुन्हा या चौपाटीविरोधात हालचाली सुरू केल्या आहेत.
कळवा आणि खारेगाव भागातील खाडीकिनाऱ्याचे सुशोभीकरण करून तेथे विस्तीर्ण चौपाटी करण्याची महत्त्वाकांक्षी योजना डॉ. अश्विनी जोशी यांनी आखली होती. मात्र या भागात अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियांचा त्याला विरोध होता. सुमारे २.८ किलोमीटर अंतराच्या या विस्तीर्ण पट्टय़ावर रेतीची साठवण करण्यासाठी ८१ लहान भूखंड पाडण्यात आले आहे. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहिली असून काही राजकीय नेत्यांनी तर लहानगे कारखानेही उभे केले आहेत. रेतीचे बेकायदा उत्खनन करायचे आणि याठिकाणी बिनधोकपणे तिची साठवण करायची असे उद्योग या भागात वर्षांनुवर्षे सुरू आहेत. ही अतिक्रमणे हटवण्यासाठी डॉ. जोशी यांनी पर्यावरण विभागाकडून निधीही मंजूर करून घेतला तसेच जिल्हा नियोजन समितीकडून अतिरिक्त खर्चाची तरतूदही करून घेतली.
कळवा खाडी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जोशी यांनी तब्बल तीन वेळा मोहिमा आखल्या. पहिल्या मोहिमेस पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी स्थगिती दिली. मात्र,कळवेकरांचे हित लक्षात घेऊन पुढे त्यांनी या चौपाटीस जाहीर पाठिंबा दिला. पालकमंत्री ऐकत नाहीत हे पाहून येथील माफियांनी भाजपच्या जिल्ह्य़ातील एका वजनदार नेत्यास गळ घातली. या नेत्याने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे बैठक आयोजित केली आणि त्यांनीही ही मोहीम काही काळ थांबवली. ही स्थगितीही कालांतराने उठविण्यात आली. त्यानंतर जोशी यांनी चौपाटीसाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले, तेव्हा राज्यातील एका बडय़ा पदाधिकाऱ्याने तोंडी सूचना देऊन जिल्हा प्रशासनाची अडवणूक केली. त्यामुळे आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात डॉ. जोशी यांना ही कारवाई करण्यात यश आले नाही.
जोशी यांची बदली झाल्यानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नवे जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्यासह गुरुवारी कळवा खाडीकिनाऱ्याची पहाणी करून चौपाटीचा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या आदेश संबंधितांना दिले आहेत. या ठिकाणी जलपर्यटनासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याने अतिक्रमण मुक्तीची मोहीम तातडीने राबविण्याचे आदेश देण्यात आहेत. मात्र यामध्ये पुन्हा एकदा राजकीय अडसर येण्याची शक्यता आहे. जिल्ह्य़ाच्या राजकारणात ‘पाटीलकी’ गाजवू पाहणाऱ्या एका नेत्याने ही कारवाई रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतल्याचे समजते.

‘भाजपचा चौपाटीस पाठिंबा’
चौपाटी तयार करताना या भागातील भूमीपुत्रांचे मतही विचारात घेतले जावे यासाठी यापूर्वी प्रकल्पास स्थगिती देण्यात आली आहे. भाजपचा चौपाटी किंवा विकासाला विरोध आहे असे चित्र विरोधकांकडून रंगविले जात आहे. यात काही तथ्य नाही. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी स्वत: या ठिकाणची पाहणी केली आहे. त्यामुळे लवकरच ही चौपाटी आकारास येईल, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका नेत्याने दिली.