प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांचे मत
इंग्रजीमध्ये लिखाण करताना सुरुवातीला खूप चुका होत होत्या. मात्र इंग्रजी भाषेत विचार करण्याने इंग्रजी भाषा सुधारते याची जाणीव झाल्यावर इंग्रजीत विचार करायला सुरुवात केली आणि इंग्रजी साहित्य लिहिणे सोपे झाले, असे मत प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी जवाहर वाचनालयात व्यक्त केले. जवाहर वाचनालयाचा सुवर्णपूर्ती कार्यक्रम नुकताच कळवा येथील महानगरपालिका शाळेत पार पडला.
मुंबईजवळच्या आदिवासी लोकांच्या जमिनीच्या हक्कासाठी लढताना सत्याग्रह केला. त्यामुळे तुरुंगात जाण्याची वेळ आली. या वेळी
तुरुंगातील गुन्हेगारांशी संवाद साधता आला आणि तेथील अनुभवातून मुसाफिर हे पुस्तक लिहिले गेले. तसेच ‘मनात’ या पुस्तकात मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून व्यक्तीच्या मनाबद्दल माहिती दिलेली आहे, असे जवाहर वाचनालय आयोजित वाचकांशी संवाद या कार्यक्रमात त्यांनी सांगितले. सहलेखिका दीपा देशमुख यांनी त्यांच्या ‘जीनियस’ पुस्तकाचे लिखाण करताना आपला लेखनप्रवास वाचकांसमोर उलगडला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर व भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांच्या साहित्यावर आधारित ‘स्वरार्चना’निर्मित संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विजेत्या लेखकांच्या साहित्याचा आढावा घेत वि. स. खांडेकरांच्या ‘ययाती देवयानी’ या कादंबरीतील कच या पात्राने नाटय़गीते सादर केली. या कार्यक्रमासाठी ‘श्वास’ चित्रपटाच्या लेखिका माधवी घारपुरे उपस्थित होत्या.