स्वयंसेवक पोलिसांचे खबरे बनणार; संयुक्त कारवाईचे आवाहन

गटारीच्या निमित्ताने येऊरच्या जंगलात घुसून मद्यपान करून धुडगूस घालणाऱ्या मंडळींवर आता पोलीस आणि वनविभागाबरोबर पर्यावरण संस्थांकडून वचक निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यावरण संस्थांचे स्वयंसेवक गटारीच्या रविवारी येऊरच्या जंगलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथे सुरू असलेल्या दारू पाटर्य़ाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. या काळात स्वयंसेवकांना पोलीस आणि वनविभागाने सहकार्य करून मद्यपींवर कडक कारवाई करावी, असे आवाहन येऊर एन्व्हॉरन्मेंट सोसायटीने केले आहे. हरित गटारीच्या माध्यमातून याविषयी जागृती केल्यानंतर आता येऊर एन्व्हॉरन्मेंट सोसायटी आता थेट मद्यपींच्या विरोधात उभे राहणार आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेले ठाणे शहरानजीकचे येऊरचे जंगल गेली अनेक वर्षे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. पर्यटक, निसर्ग अभ्यासक आणि हौशी वन्यप्रेमींबरोबरच या भागामध्ये मद्यपान करणाऱ्या मंडळींचा राबताही वाढला असून त्यांचा उपद्रव येथील वन्यप्राण्यांना आणि येथील निसर्गाला होत आहे. मद्यपान केल्यानंतर मद्याच्या बाटल्या तेथेच टाकणे, बाटल्या फोडून काचा करणे आणि सोबतचा कचरा तेथेच टाकणे हे प्रकार वाढीस लागले आहेत. गटारीच्या रविवारी या मंडळींचा उच्छाद कमालीचा वाढतो. २०१४ मध्ये ठाण्यातील संस्थांनी एकत्र येऊन या भागात गटारीच्या दिवशी पाहणी केली होती.

त्यावेळी येऊरच्या जंगलामध्ये सुमारे १३०० हून अधिक मद्यपींचे जथ्थेच्या जथ्थे या भागात ओल्या पाटर्य़ा करत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन ठाण्यातील पर्यावरणप्रेमींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. वनशक्ती, पर्यावरण दक्षता मंच, अर्थ किड्स, ग्रीन लाईन, होप, क्रायसिस, वाईल्ड वेल्फेअर असोसिएशन या संस्थांनी संयुक्तपणे येऊर एन्व्हॉरन्मेंट सोसायटीची स्थापना केली.

गतवर्षी या संस्थेने एकत्रित येऊन येऊरच्या जंगलामध्ये ‘हरित गटारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. या वेळी येऊरमध्ये गटारीच्या रविवारी वृक्षारोपण आणि निसर्ग भटकंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. मात्र तरीही मद्यपींचे प्रमाण या भागात कायम होते. त्यामुळे यंदा या मद्यपींवर कारवाई करण्यासाठी थेट पोलिसांशी संपर्क साधून कारवाई करण्याची विनंती या संस्थांकडून केली जात आहे. त्यासाठी संस्थांचे स्वयंसेवक छोटय़ा-छोटय़ा गटातून येऊरची पाहणी करून वेगवेगळ्या भागातील माहिती पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देणार आहेत, अशी माहिती संस्थेचे आदित्य सालेकर यांनी दिली. या उपक्रमामध्ये सामान्य निसर्गप्रेमीसुद्धा सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क रोहित जोशी – ९८१९७६९०६९, आदित्य सालेकर- ८१०८३९६९०६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

येऊर हे खाण्या-पिण्याचे स्थान नाही..

येऊरचा निसर्ग हा मुंबई आणि ठाणे परिसरातील अत्यंत संवेदनशील वन विभाग असून येथील निसर्गाचा आस्वाद नागरिकांनी जरूर घ्यावा. मात्र येथील निसर्गाची हानी होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. गटारीनिमित्ताने खाण्यापिण्यासाठी या भागात नागरिकांनी येऊ नये. त्यासाठी फार्म हाऊस, हॉटेल्सची सुविधा अन्य ठिकाणी आहे. येऊरच्या जंगलात असे मद्यपान निषिद्ध असून कायद्याने गुन्हा आहे, अशा प्रकारच्या कृत्यांवर कारवाई केली जाईल. वनविभागाच्या या कामाला निसर्गप्रेमी संस्था सहकार्य करत असून त्यांना आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी माहिती वनविभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.