ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलांवर चढण्यासाठी सहा नवे सरकते जिने लावण्यात येणार आहेत. तर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन नवे उद्वाहक (लिफ्ट) बसवण्यात येणार आहेत. सहापैकी चार सरकते जिने आणि तीन उद्वाहक रेल्वेच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या पुलावर बसवण्यात येणार आहेत. तर अन्य दोन जिने एमआरव्हीसीच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या पुलांस जोडणार आहेत. रेल्वेचे विद्युत विभागाचे वरिष्ठ अभियंता आर. के. चौबे यांनी याविषयीची माहिती दिली. खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेचे प्रबंधक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्या वेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एका बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी ठाण्यातील वेगवेगळ्या विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. ठाण्यावरून सुटणाऱ्या ठाणे – वाशी या हार्बर मार्गावर वारंवार ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रेन ठप्प होत आहेत. त्यामुळे या मार्गावरून नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर एसी-डीसी परिवर्तनामुळे वायर वारंवार तुटल्याचे प्रकार घडत होते. मात्र हे काम पूर्ण झाल्यापासून आठवडय़ाभरात अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ठाणे रेल्वे स्थानकातील संथगतीने सुरू असलेले पूर्वेकडील शौचालयाचे काम, वाहनतळाच्या इमारतीचे काम व पादचारी पुलांचे काम, सरकते जिने व इतर कामांचा आढावा घेण्यात आला. ही कामे लवकर पूर्ण करून देण्याचे आश्वासन रेल्वेकडून देण्यात आले.