tvlogमहिला आणि साडय़ा म्हणजे जणू काही ‘एक दुजे के लिये’च. अगदी एकमेकांसाठीच बनलेल्या. साडीचा मोह नसलेली महिला मिळणे दुर्मीळच. त्यामुळे साडीचे दुकान म्हटले की अनेक महिला त्यात अगदी हरवून जातात. त्यात जर साडी सिल्कची असेल तर दुधात साखर, अशी त्यांची अवस्था होते. ठाण्यात सध्या हॉटेल टीप-टॉप प्लाझामध्ये ‘सिल्क’ साडय़ांचे प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनामध्ये बिहारी नैसर्गिक तस्सर स्लिक, कर्नाटकमधील गाररोटी स्लिक, अरिनी सिल्क, तसेच आंध्र प्रदेशमधील धरमावरा, उपडा, गडवाल, मंगलागिरी, पोचंपाली सिल्क आणि महाराष्ट्रातील पैठणी, पंजाबमधील पटीयाला सिल्कचे प्रकार उपलब्ध आहेत. सिल्क इंडियातर्फे हे प्रदर्शन सध्या सुरू असून ते सोमवार २० एप्रिलपर्यंत सुरूराहणार आहे.
स्थळ : हॉटेल टीप-टॉप प्लाझा, चेक नाक्याजवळ, लालबहादूर शास्त्री मार्ग, ठाणे
वेळ : सकाळी १०.३० ते रात्री ८.३०

छायाचित्रणातील बारकावे शिका
उद्योन्मुख छायाचित्रकारांना छायाचित्रणातील बारकावे छायाचित्रकार ज्योती राणे यांच्याकडून शिकण्याची नामी संधी या वीकेण्डला ठाणेकरांना प्राप्त होणार आहे. ठाण्याच्या फोटो सर्कल सोसायटीच्या माध्यमातून कापुरबावडी येथील ठाणे कलाभवनात ६३व्या स्लाइड शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संधिप्रकाशातील छायाचित्रण, झुंजूमुंजू होण्याच्या वेळी काढण्यात येणारी छायाचित्रे यांसारख्या विषयात पारंगत असलेल्या छायाचित्रकार ज्योती राणे या त्यांच्या छायाचित्रांच्या ‘स्लाइड शो’च्या माध्यमातून छायाचित्रण क्षेत्रात पाय रोवू इच्छिणाऱ्या छायाचित्रकारांना विनामूल्य मार्गदर्शन करणार आहेत.
’कधी : रविवार, १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता
’कुठे : ठाणे कलाभवन, बिगबझार जवळ, कापुरबावडी, ठाणे (प)
’संपर्क : ९७०२५५२२३३/ ९८१९९७७९०८

‘गावदेवी कार्निव्हल’
उन्हाळ्याच्या सुटीत कुठे जायचे, काय करायचे, असे अनेक प्रश्न पडतात. अभ्यासाचा वेळ नसल्याने मुलांपाशी बराच वेळ असल्याने पालक एखाद्या नावीन्यपूर्ण गोष्टीच्या शोधात असतात. या आठवडय़ात असा काही बेत आखत असाल तर कळव्यात आयोजित ‘गावदेवी कार्निव्हल’ला भेट देता येईल. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मंदार केणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने १७ ते १९ एप्रिल दरम्यान गावदेवी मैदान येथे ‘गावदेवी कार्निव्हल’ आयोजित करण्यात आले आहे. त्यात साहित्य, संस्कृती तसेच मनोरंजनपर कार्यक्रमांची रेलचेल असेल. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांच्या हस्ते ढोल-ताशांच्या गजरात ‘कार्निव्हल २०१५’चे उद्घाटन होईल. त्याच दिवशी संध्याकाळी ६.०० वाजता गायक, संगीतकार श्रीधर फडके यांचा ‘गीतरामायण’ हा कार्यक्रम ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. शनिवारी सायंकाळी ६.०० वाजता पैठणीच्या खेळामध्ये महिलांना पैठणी व आकर्षक बक्षिसे जिंकता येणार आहेत. त्याचबरोबर ‘जय मल्हार’फेम ‘खंडेराय’ म्हणजेच अभिनेता देवदत्त नागे, ‘जुळून येती रेशीमगाठी’मधील ‘आदित्य’ अर्थात ललित प्रभाकर, ‘देवयानी’ मालिकेमधील ‘देवयानी’ म्हणजे भाग्यश्री मोते आणि विवेक सांगळे उपस्थित राहणार आहेत. तसेच ‘चल हवा येऊ  द्या’तील विनोदी कलावंत भाऊ  कदम, कुशल बद्रिके  आणि हेमांगी कवी यांच्या विनोदाची धमाल रसिकांना अनुभवता येणार आहे. रविवारी ‘बालक पालक’मध्ये मुलांसोबत पालकांसाठीही विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. ५ ते १० वर्षे वयोगटांतील मुले व त्यांच्या पालकांसाठी फॅशन शो होणार आहे. जगलर शो, गेम शो व मॅजिक शो तसेच छोटा भीम, चुटकी आणि सहकाऱ्यांसोबत मुलांना धम्माल करता येणार आहे. विविध कार्टूनच्या आवाजाची जादू दाखविणारी मेघना एरंडे आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटातील बालकलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत.
’स्थळ : गावदेवी मैदान, कळवा

अंबरनाथमध्ये राहुल सक्सेना लाइव्ह
रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट या संस्थेच्या वतीने शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता फातिमा शाळेचे मैदान, अंबरनाथ (प.) येथे सुप्रसिद्ध गायक राहुल सक्सेना आणि ‘सांगतो ऐका’फेम संस्कृती बालगुडे यांची मैफल आयोजित केली आहे. या रोटरी क्लबच्या वतीने शहराबाहेरील ठाकूरपाडा येथे आदिवासी शाळा चालवली जाते. या शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन क्लबच्या वतीने केले जाते. शाळेचा खर्च भागविण्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने दरवर्षी एक मनोरंजनपर कार्यक्रम शहरात केला जातो. यंदा ‘झी’ सारेगमफेम राहुल सक्सेना आणि त्याचे सहकारी जुनी-नवी बहारदार गाणी सादर करणार आहेत.
’स्थळ : फतिमा हायस्कूलचे मैदान, अंबरनाथ (पश्चिम), ’शनिवार, १८ एप्रिल, संध्याकाळी साडेसहा   

भरतनाटय़म नृत्य

संस्कृती अ‍ॅकॅडमी ऑफ फाइल आर्ट या संस्थेच्या वतीने ‘भरतनाटय़म अरंगेत्रम’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या विद्यार्थिनी श्रुती, सौम्या आणि सुमिता त्यांची बहारदार भरतनाटय़म नृत्य कला सादर करणार आहेत. रविवारी सकाळी १०.३० वाजता डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह, हिरानंदानी मेडोज, ठाणे (प.) येथे हा कार्यक्रम सादर होणार आहे.

उन्हाळी शिबीर
वार्षिक परीक्षा होईपर्यंत अगदी डोळ्यात प्राण आणून मुले उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहत असले तरी ती एकदा सुरू झाली की एक-दोन दिवसांतच नंतर काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडतो. अशा वेळी पालक त्यांना निरनिराळ्या उन्हाळी शिबिरात घालतात. तिथे नवीन काही तरी शिकायला मिळतेच, शिवाय वेळही मजेत जातो. कल्याणमधील अभिरंग बालकला संस्थेने २५ ते २८ एप्रिल दरम्यान ‘नेचर आय समर कॅम्प’ आयोजित केला आहे. मुरबाड रोडवरील मामणोली येथे हे उन्हाळी शिबीर होणार आहे.
सहा ते १६ वयोगटांतील मुले-मुली त्यात भाग
घेऊ शकतील. त्यात मुलांना सूर्यनमस्कार, रोप लागवड, लिगोर्चा, सावल्यांचे खेळ, पक्ष्यांची घरे
बनविणे, नकाशावरून खजिना शोधणे, ठसे उमटविण्याची कला, पपेट शो, आकाश दर्शन असे विविध उपक्रम होतील.   
संपर्क : ९६६४७६१७३९ किंवा ९८९२७३७१९७.

एसडी आणि आरडी बर्मन संगीत संध्या
एस.डी. आणि आर.डी. बर्मन म्हणजे चित्रपट संगीताचे सुवर्णयुग गाजविणारे पितापुत्र. जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणारी आणि आयुष्याचे तत्त्वज्ञानही सहजपणे गीतांतून मांडणारे हे संगीतकार आहेत. दोघांच्याही गीतसंगीतात मस्ती आहे, उन्मादही आहे अन् तितकेच गांभीर्य आणि हळवेपणाही आहे. त्यांच्या अजरामर गाण्याची सुरेल मैफल ‘एस.डी. अ‍ॅण्ड आर.डी. बर्मन नाइट’ हा कार्यक्रम रविवार, १९ मार्च खास ठाणेकरांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
स्थळ : डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृह, हिरानंदानी मेडोज, ठाणे (प.)
वेळ : रात्री ८.१५   

सांगीतिक शनिवार
ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये दर शनिवारी होणाऱ्या सांगीतिक मैफलीत १८ एप्रिल रोजी ‘बावरा मन’फेम सुप्रसिद्ध गायिका मधुश्री भट्टाचार्य यांच्या गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली आहे.  
 स्थळ : विवियाना मॉल, ठाणे (प)
वेळ : सायंकाळी ६.३० पासून

मिल्क शेक बनवा!
उन्हाळा सुरू झाला की थंड पदार्थ खाण्यासाठी अनेकांची पाऊले कोल्ड्रिंक पार्लरकडे वळतात. मात्र बाहेर मिळणाऱ्या या थंड पदार्थाच्या स्वच्छतेबाबत कोणतीही खात्री देता येत नाही.  कोरम मॉलने ‘वुमन्स ऑन वेन्सडे’ उपक्रमांतर्गत बुधवारी खास महिलांसाठी ‘’मिल्क शेक’ बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये चॉकलेट्सपासून बनवलेले ‘चोको ओव्हरलोड मिल्क शेक’,  घट्ट ‘मॅन्गो मिल्क शेक’, कॉफीपासून बनवलेले ‘कॅफे फ्रॅपे’, ‘ऑरेंज क्रिमसिल’, ब्लॅक करंट मिल्क शेक आणि अंजीरपासून बनविलेले ‘फिग मिल्क शेक’चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
’स्थळ  : कोरम मॉल, मंगल पांडे रोड, कॅडबरी जंक्शनजवळ, द्रुतगती महामार्ग, ठाणे (प.)’वेळ : दुपारी ३ ते रात्री ८

संकलन : शलाका सरफरे