आनंदवनातल्या कामाचा, प्रयोगाचा मी सुरुवातीपासून साक्षीदार व भागीदारही आहे. त्यामुळे मी स्वत:ला बाबांच्या स्वप्नांचा ठेकेदार मानतो, अशा भावना डॉ. विकास आमटे यांनी बदलापूर येथे सत्कर्म परिवारातर्फे आयोजित स्मृतिगंध या कार्यक्रमात व्यक्त केल्या. ते बाबा आमटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते. या प्रसंगी समाजाप्रती संवेदनशील असणाऱ्या व्यक्ती, संस्था व सत्कर्म परिवार यांनी आनंदवनासाठी सोळा लाखांचा निधी गोळा करून दिला. यात डोंबिवलीतील प्रिसिजन इंजिनीअरिंगच्या बुचडे यांनी तब्बल अकरा लाखांचा धनादेश देत मोलाचा वाटा उचलला. मांजर्ली येथील स्मशानभूमीत स्वयंप्रेरणेने अंत्यसंस्काराचे काम करणारे रमेश नेमाडे यांच्या हस्ते हे धनादेश आमटे यांना सुपूर्द करण्यात आले. आनंदवनस्नेही शशिकांत पाटणकर, उद्योजक प्रवीण हेर्लेकर, प्रमोद बक्षी, सुयोग मराठे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
मुक्त संवादातील या कार्यक्रमात डॉ. विकास आमटे म्हणाले की, मी कुष्ठरोग्यांसोबतच लहानाचा मोठा झालो. माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मी बाबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम करत आहे. ‘श्रम ही ईश्वर है’ या बाबांच्या ध्येयाला अनुसरून आज आनंदवन व परिसरात अनेक प्रकल्प उभारले आहेत. बाबांनी गरजूंना अंधाराकडून उजेडाकडे आणलेच; परंतु ते पुन्हा उजेडाकडून अंधाराकडे उपेक्षितांच्या शोधात गेले. अन्न हेच आजचे अध्यात्म असायला हवे, या बाबांच्या उक्तीचा त्यांनी पुनरुच्चार केला. या वेळी त्यांनी बाबा आमटेंच्या अनेक आठवणी सांगितल्या. तसेच पु.ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, यशवंतराव चव्हाण, एकनाथ ठाकूर आदींच्या आनंदवन भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. आनंदवन, सोमनाथ आणि हेमलकसा या तीन प्रमुख उपक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती या वेळी दिली व सर्वाना या प्रकल्पाला भेट देण्याचे आवाहनही केले. या मुक्त संवादात त्यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीव साळी यांनी तर सूत्रसंचालन प्रा. रमेश बुटेरे यांनी केले. विकास वखारे यांनी आभार मानले.