ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणारा दिवा परिसर अनेक समस्यांमुळे ओळखला जात असून या भागात सेवा देणाऱ्या यंत्रणेकडून अधिकचा भार घेण्याची नवी पद्धत येथे सुरू आहे. दूध, गॅस आणि धान्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेकडून येथील नागरिकांची लूट केली जात असून अधिभाराच्या नावे मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला जातो. या भागामध्ये गॅसचे वितरकांकडे गॅस नोंदणी केल्यानंतर पुरवठा अत्यंत उशिरा होत असून गॅस घरपोच करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ३० ते ३५ रुपयांची मागणी केली जाते. वरील शुल्क हे सेवा शुल्क असून आम्हाला पगार मिळत नसल्याने आम्ही प्रत्येक ग्राहकांकडून ते घेतो असे उलटचे उत्तरसुद्धा या कर्मचाऱ्यांकडे असल्याने ग्राहकांना नाइलाजाने हे पैसे द्यावे लागतात.  
नागरिकांसाठी अनेक समस्यांची खैरात करत असलेल्या दिवा परिसरामध्ये जीवनावश्यक गॅस पुरवण्यासाठी सुद्धा अधिकचे शुल्क भरावे लागत असून येथील हजारो नागरिकांकडून लाखो रुपयांची लूट गॅस वितरकांचे कर्मचारी करत आहेत. या प्रकरणी गॅस वितरकांकडे तक्रार केल्यानंतर अशा प्रकारचे अधिकचे शुल्क देऊ नका, असे सांगितले जाते. मात्र पुढील महिन्यामध्ये परिस्थिती सारखीच असते. ६३० रुपयांच्या गॅससाठी कधी ६६० तर कधी ६५० रुपयांची मागणी केली जात असल्याने येथील रहिवाशांना प्रत्येक माहिन्याला अधिकचा भार सहन करावा लागतो. गॅस वितरकांनी याकडे लक्ष घालण्या बरोबरच संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना करण्याची गरज येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
श्रावणी गावडे, दिवा