ठाणे आणि उल्हासनगर महापालिकांच्या निवडणुका महिन्यावर येऊन ठेपल्या असतानाच या दोन्ही शहरांना लागूनच असलेल्या भिवंडीमध्ये बनावट निवडणूक ओळखपत्र आणि आधारकार्ड बनविणारी टोळी ठाणे पोलिसांच्या हाती लागली आहे. या बनावट कागदपत्रांद्वारे मोबाइल सीमकार्डची खरेदी करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली आहे. असे असले तरी, या बनावट कागदपत्रांचा पालिका निवडणुकांमध्ये वापर करण्याचा प्रयत्न होता का, याचा पोलीस तपास करीत आहेत.

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने सात जणांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून बनावट निवडणूक ओळखपत्र आणि आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत. बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे सीमकार्डची खरेदी व विक्री करण्याचे काम ही टोळी करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. घरातील संगणकावरच ही कागदपत्रे तयार करण्यात येत होती. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. तसेच ही टोळी बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे सीमकार्डची खरेदी व विक्री करायचे, असे तपासात समोर आले आहे. बनावट कागदपत्रांचा वापर सीमकार्ड खरेदीसाठी होत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आल्याचे ठाणे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी स्पष्ट केले. तसेच निवडणुकांचा आणि या कागदपत्रांचा काही संबंध आहे का, याचाही तपास करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जप्त कागदपत्रे

* ४९ हजार ९३६ जणांची पारपत्र आकाराचे छायाचित्रे

* ९४०० बनावट आधारकार्डाच्या छायांकित प्रती

* ३०७२ बनावट निवडणूक ओळखपत्राच्या छायांकित प्रती