अंबरनाथ, बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून पडून दर्शना पवार या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. चोरीच्या उद्देशातून मारलेला दगड लागला आणि ती खाली पडली. त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
बदलापूरमध्ये राहणारी दर्शना नवी मुंबईतील एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला होती. ९ फेब्रुवारीला ठाण्याहून ७.२० च्या बदलापूर लोकलने कामावरून घरी येण्यासाठी ती निघाली होती. अंबरनाथ – बदलापूर स्थानकादरम्यान एका खांबाजवळ ती लोकलमधून खाली पडली. त्यात तिचा मृत्यू झाला.
दर्शना लोकलमधून पडल्यानंतर १५ ते २० मिनिटांत स्टेशन मास्तर घटनास्थळी पोहोचले; परंतु ती जिथे पडली तिथे तिची पर्स, चप्पल आणि मोबाइल आढळला नाही. हे सर्व साहित्य अपघात झाला त्या ठिकाणापासून दूर अंतरावर अस्ताव्यस्त पडले होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा प्रकार झाल्याचा कुटुंबीयांचा संशय आहे.
 दर्शनाला एका समाजसेविकेच्या मदतीने अंबरनाथ पालिकेच्या छाया रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि त्यानंतर मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु जे.जे. मध्ये अतिदक्षता विभाग उपलब्ध नसल्याने मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात नेले. परंतु ती वाचू शकली नाही.
माहिती घेऊन गुन्हा दाखल करणार
या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद केली असून माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी सांगितले. चोरीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे. तसेच दर्शनाला वेळीच वैद्यकीय उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचला असता असेही तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.