महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे पाहून अस्वस्थ झालेल्या अमेरिकेतील एका अनिवासी भारतीय तरुणांच्या गटाने ‘सेव्ह इंडियन फार्मर्स’ ही संस्था स्थापन करत पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबांकडे मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेतील ४० ते ५० तरुण-तरुणींचा हा गट गेल्या तीन वर्षांपासून कोणताही गाजावाजा न करता हा उपक्रम राबवत आहे. विशेष म्हणजे, या संस्थेची उभारणी आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची कल्पना ज्यांच्या डोक्यातून साकारली, ते हेमंत जोशी मूळचे बदलापूरचे रहिवासी आहेत.
– बदलापूर येथील मूळ निवासी असलेले हेमंत जोशी अमेरिकेत डेटा इंजिनीअर म्हणून काम पाहत आहेत. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या त्यांच्या वाचनात आल्या. सरकारी मदत मिळूनही आत्महत्या का थांबत नाहीत, असा प्रश्न पडल्याने त्यांनी यावर अधिक अभ्यास केला. तेव्हा ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या’ संकेतस्थळावर ४१ मिनिटात एक शेतकरी आत्महत्या करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यामुळे अस्वस्थ झालेल्या हेमंत जोशी यांनी तीन ते चार वर्षांपूर्वी ‘सेव्ह इंडियन फार्मर्स’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेचे संकेतस्थळ तयार झाल्यानंतर परदेशात वास्तव्य करणाऱ्या अनेक भारतीयांकडून मदतीचा ओघ सुरू झाला.
‘सेव्ह इंडियन फार्मर्स’ संस्थेने यवतमाळ जिल्ह्यातील पाथरी गावातील आत्महत्या केलेल्या ११ शेतक ऱ्यांच्या विधवा पत्नींसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या कुटुंबीयांना किराणा दुकान सुरू करून देणे, शेळ्या घेऊन देणे, पाण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन त्यावर भाजीपाला लागवडीसाठी सहाय्य करणे असे उपक्रम या संस्थेने हाती घेतले आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या पदरी पैसे पडतील, अशी व्यवस्था उभी करण्यात आली आहे. अमेरिकेतील ‘सेव्ह इंडियन फार्मर्स’कडून येणारा विकास कामांचा निधी दीनदयाळ ट्रस्ट संस्थेचे कार्यकर्ते गावामध्ये आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांना गरजेप्रमाणे साधन रूपाने वाटप करतात. या कामांवर योग्य रीतीने निधी खर्च झाला आहे की नाही याची त्रयस्थ पाहणी नागपूरची वैनगंगा ही संस्था करीत आहे. शेतक ऱ्याच्या मुलांना उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे. त्यांच्या हातांना काम मिळून दोन पैसे मिळतील, अशी व्यवस्था उभी राहावी या विचाराने संस्थेचे काम सुरू आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले.

बळीराजाच्या मदतीसाठी

* आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी निधी उपलब्ध करावा म्हणून येत्या महिन्यात न्यू जर्सी येथे भारत कला विकास मंचतर्फे भारतीय कला नृत्यप्रकाराचा कार्यक्रम होणार आहे.
* अमेरिकेतील धनश्री बहिरट या महिलेने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला दत्तक घेतले आहे.
* अरूशी चंदने हिने आपली चित्रे लिलावात काढून मिळालेला निधी सेव्ह इंडियन फार्मर्सला दिला आहे.
* अपूर्वा या बालिकेने वाढदिवासाचे पैसे संस्थेला दिले आहेत.