‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’ असे म्हटले जात असले तरी थंडीच्या काळात अंडी खाणे आरोग्यवर्धक मानले जाते. मानवी आहारात प्रथिने अतिशय महत्त्वाची असतात. अंडय़ांमधून ती मोठय़ा प्रमाणात मिळतात. अंडय़ांचे विविध प्रकार खवय्यांना आवडतात. डोंबिवलीतील शांतादुर्गा कॅटर्स यांनी खास सकाळची न्याहरी म्हणून अंडा पाव व भुर्जी-पावची सोय केली आहे. येथील भुर्जी-पावमध्ये वापरला जाणारा मसाला त्याची खासीयत आहे. डोंबिवली शहराबरोबरच कल्याण, ठाणे, दादर आदी परिसरातील खवय्येही त्यांच्याकडून सकाळची नाहारी घेऊन जातात.

डोंबिवली पूर्वेतील शिवाजी पुतळ्याजवळ मनीषा वायंगणकर यांच्या ‘शांतादुर्गा’ कॅटर्सची छोटी गाडी आहे. सकाळची न्याहारी म्हणून शहरात मुख्यत्वे पोहे, उपमा, शिरा, इडली, मेदुवडा आदी पदार्थ मिळतात. मात्र तुम्हाला सकाळी नाश्त्याला अंडे खायचे असेल तर ते घरीच बनवावे लागते. कारण उत्तम दर्जाचे अंडय़ाचे पदार्थ बाहेर मिळणे दुर्लभ असते. डोंबिवलीतील शांतादुर्गा कॅटर्समध्ये मात्र अंडय़ांचा फर्मास नाश्ता मिळतो. विशेषत: येथील भूर्जी-पाव ही त्यांची खासीयत असून त्याला जास्त मागणी असते. मात्र तो विशिष्ट मसाला संपला असेल तर नागरिक भूर्जी-पाव नको असे सरळ सांगतात. भूर्जी-पावसाठी लागणारा हा मसाला ते स्वत: घरी बनवितात. त्यात कांदा, टोमॅटो, मिरची, मिरची पावडर व गरम मसाला तव्यावर प्रथम फ्राय करून घेतला जातो. या मसाल्यातच अंडय़ासाठी लागणारे मीठ प्रमाणात टाकण्यात येते. मसाला आणि मीठ अंडय़ात चांगले मुरत असल्याने त्याची छान चव लागते. अंडे हे पौष्टिक आहे. नियमितपणे व्यायाम करणारे येथे अंडय़ांचे पदार्थ खातात. त्यांच्यासाठी आम्ही आमलेट पाव हा नाश्ता देतो. असा नाश्ता केल्यानंतर सोलकढी घेतली की उत्तम पचते. शिवाय पोटात थंडावाही मिळतो.

रेल्वे स्थानकाजवळच हा स्टॉल असल्याने लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी न्याहारीचे हे उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे अनेक नागरिक येथून सकाळच्या वेळी पार्सल घेऊन जातात. काही जण लोकलमधील आपल्या ग्रुपसाठीही दुसऱ्या दिवशीची ऑर्डर देऊन जातात. रविवार, बुधवार, शुक्रवार अशा वाराच्या दिवशी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे या पदार्थाची ख्याती ही केवळ डोंबिवलीपुरती मर्यादित राहिलेली नाही. कल्याण, अंबरनाथ बदलापूरकडची मंडळी खास भुर्जी-पाव खायला येतात. यासोबतच वेगवेगळ्या हवामानानुसार शीतपेयही येथे मिळतात. आता आवळ्याचा सीझन सुरू होत असून ताजा आवळ्याचा घरी बनवलेल्या रसाची चव खवय्यांना चाखता येणार आहे. यासोबतच कोकम सरबत, मसाला ताक, पीयूषही येथे मिळते.

गेले सात वर्षे आम्ही येथे भूर्जी-पाव व आमलेट पाव हे पदार्थ देणे सुरू केले असून खवय्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी आम्हीसुद्धा इडली सांबार, मेदूवडा असे पदार्थ न्याहारीसाठी देत होतो. मात्र रेडी टु कुकच्या जमान्यात या पदार्थाची आवड कमी कमी होत गेली. एरवी संध्याकाळच्या वेळी मांसाहारी पदार्थाची मेजवानी खवय्यांना मिळते. सकाळी या पदार्थाना कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबतीत आम्ही साशंक होतो. मात्र गेल्या सात वर्षांत आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे मनीषा वायंगणकर यांनी सांगितले.

शांतादुर्गा कॅटर्स

शिवाजी पुतळ्याजवळ, मानपाडा रोड,

डोंबिवली (पू.)

वेळ – सकाळी ८ ते दुपारी ३