शेतकऱ्यांना चांगला मोबदला, ग्राहकांच्या पदरी निराशाच
बाजार समित्यांमधून कृषिमाल नियंत्रणमुक्त व्हावा यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला असला तरी या माध्यमातून सुरू झालेल्या स्वस्त भाजी केंद्रातून ग्राहकांच्या पदरात मात्र किरकोळीच्या दरानेच भाजी पडत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
tv08ठाणे शहरात दर शनिवारी संस्कार आणि पणन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गावदेवी मैदान येथे आठवडी बाजार भरविण्यात येतो. या बाजारात मिळणारा भाजीपाला लगतच असणाऱ्या गावदेवी भाजी बाजारातील किरकोळीच्या दरानेच विकला जात असल्याचे चित्र सद्य:स्थितीत दिसत आहे. याबाबतीत आयोजकांना विचारले असता, ठाण्यात सध्या गावदेवी, हिरानंदानी, साकेत कॉम्प्लेक्स, ढोकाळी, एव्हरेस्ट सोसायटी येथे हा आठवडी बाजार सुरू आहे. त्यामुळे उत्पादन खर्च, वाहतूक आणि वितरणाच्या किमतीचे गणित बसविताना किमतींमध्ये चढ-उतार होत असतात. येथील भाज्यांचे दर हे किरकोळ बाजारातील दरांशी साधम्र्य साधणारे असले तरी येथे येणारा भाजीपाला हा ताजा असतो व थेट शेतातून आणला जातो, असा दावा आयोजकांनी केला. तसेच जागरूक ग्राहक शेतकऱ्यांना नफ्याचा वाटा देण्यासाठी मागे-पुढे पाहत नाहीत. मात्र येत्या काही दिवसांमध्ये ठाणे शहराच्या वागळे इस्टेट, वर्तकनगर अशा पाच ते सहा ठिकाणी हा आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे. त्यामुळे आवकवाढीस मदत होईल व किमतीही कमी होतील, अशी माहिती संस्कारचे सुनेश जोशी यांनी दिली. वर्षांनुवर्षे व्यापाऱ्यांची भर आणि जनतेची लूट हे चक्र अविरत सुरू आहे. यातून ग्राहकांची आणि शेतकऱ्यांची सुटका व्हावी यासाठी सरकारने घेतलेल्या आठवडी बाजाराची संकल्पना अमलात आणली. ग्राहकही त्याला उत्तम प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सरकार आणि स्थानिक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या आठवडा बाजारात सुरुवातील १२ टन भाजीचा खप होत असे. आता हा आकडा २० टनापर्यंत पोहोचला आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार येथे फळांचीही विक्री केली जाते, अशी माहिती आयोजकांनी दिली.