तहसीलदारांच्या बदलीची शिफारस

हक्काची जमीन दुसऱ्याच व्यक्तींच्या कब्जातून सोडविण्यासाठी सरकारी कार्यालयात खेटे मारणाऱ्या एका शेतकऱ्याने शासकीय कारभाराला कंटाळून मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी घेऊन  नुकतीच आत्महत्या केली होती. ती आत्महत्या सरकारी अनास्थेमुळेच झाल्याचे सिद्ध झाले आहे. याप्रकरणी तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या बदलीची शिफारस करत मंडल अधिकारी आणि लिपीक यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करावी, असे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुरबाडजवळील शेलगाव येथे राहणारे अशोक शंकर देसले यांनी १० मे रोजी तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. अशोक देसले गेल्या वर्षभरापासून आपली हक्काची जमीन मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांत चकरा मारत होते. त्यांच्या नावे असलेली जमीन त्यांच्या नातेवाईकांनी देसले हे मृत असल्याचे दाखवून हडपली होती. ही जमीन त्यांच्या कब्जातून सोडविण्यासाठी त्यांनी अनेक कार्यालयांत खेटे घातले. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.

देसले यांच्या आत्महत्येस तहसीलदार, तलाठी, मंडल अधिकारी आणि इतर कर्मचारी दोषी असून त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच देसले यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला. यात देसले यांच्या आत्महत्येप्रकरणी महसूल विभागाची निष्क्रियता कारणीभूत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. यात चुकीच्या पद्धतीने फेरफार नोंदवणाऱ्या तत्कालीन तलाठी एन. ए. पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या सेवानिवृत्त पण तत्कालीन मंडल अधिकारी टी. एम. शिर्के व देसले यांचा अर्ज दीर्घकाळ प्रलंबित ठेवणारे लिपिक निवृत्ती म्हस्के यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच मुरबाडचे तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील व नायब तहसीलदार महसूल अजय पाटील यांची बदली करण्याची यावी, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अशोक शंकर देसले यांच्या आकस्मिक मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कल्याणचे उपविभागीय अधिकारी प्रसाद उकिर्डे यांना दिले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत देसले यांच्या जमिनीवर ते हयात असतानाही त्यांच्या भावाच्या वारसांची चुकीच्या पद्धतीने नोंद करण्यात आली असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या आत्महत्येप्रकरणी तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटील यांच्या फक्त बदलीच्या शिफारसीने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आता जोर धरते आहे.