पती-पत्नीतील भांडणातून बदलापूरमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार

नेहमीप्रमाणे प्रभातफेरीसाठी म्हणून उल्हास नदीवरील वालीवली-एरजंडाजवळील पुलावर गुरुवारी नागरिकांची वर्दळ वाढू लागली. प्रवाहाच्या आवाजातही ‘काका.. काका’ अशी क्षीण हाक अनेकांच्या कानावर पडली. कुतूहलाने नदीत पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला.. नदीत वाढलेल्या जलपर्णीवर एक सहा वर्षांची चिमुकली तरंगत होती आणि वाचविण्यासाठी ओरडत होती.. विभक्त पत्नीशी झालेल्या वादातून सावत्र बापानेच तिला रात्री या नदीत फेकले होते, पण त्यानंतर तब्बल दहा तास नदीतल्या जलपर्णीने तिला जणू फुलासारखे जपले होते! त्या नराधमाचा शोध आता सुरू आहे.

एकता सैनी असे या चिमुकलीचे नाव आहे. तिचे आई-वडील विभक्त असून ती आईसोबत ठाण्यात लोकमान्य नगरात राहाते. हा सावत्र बाप पुण्यात राहातो. बुधवारी तो ठाण्यात आला होता आणि पत्नीला सोबत येण्याचा आग्रह करीत होता. मात्र, तिने नकार दिल्याने त्याने संतापून एकताला पळवून नेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर बुधवारी सायंकाळपासूनच एकता बेपत्ता होती. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तिच्या आईने तक्रारही नोंदवली होती.

तुला नवीन चप्पल देतो, असे सांगत या नराधमाने तिला नेल्याचे समजले आहे. त्यानंतर त्याने ठाण्याहून तिला बदलापूरला नेले आणि रात्री आठच्या सुमारास या पुलावरून नदीत फेकून दिले. नदीवर जलपर्णीचे आच्छादन असल्याने ती त्यावरच पडल्याने बुडाली मात्र नाही. सकाळी सातच्या सुमारास तिच्या हाका ऐकून गावकऱ्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला तात्काळ बोलावले. त्यांनी दोरखंडाच्या मदतीने तिला बाहेर काढले. तिने ठाण्याचा पत्ता सांगितल्यावर तिच्या आईने आदल्याच दिवशी तिच्या अपहरणाची तक्रार नोंदविल्याचे उघड झाले.  या सावत्र बापाचा शोध सुरू आहे.

पाटबंधारे विभागाची ‘कामगिरी’

गेल्या काही दिवसांपासून दूषित सांडपाण्यामुळे उल्हास नदीत मोठय़ा प्रमाणात जलपर्णी साचली होती. जलपर्णीच्या विळख्यात सापडलेल्या या नदीच्या स्वच्छतेची मागणी नागरिकांकडून अनेकदा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. मात्र त्याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले. मात्र याच जलपर्णीमुळे या चिमुकलीचा जीव वाचल्याने ‘बरे झाले जलपर्णी तरी होती’, अशी सुटकेचा नि:श्वास सोडणारी प्रतिक्रिया लोकांमध्ये उमटत होती.