डोंबिवलीत शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची
जिल्हाप्रमुखांच्या समक्ष पक्षातील सुंदोपसुंदी उघड
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपसोबत चार हात करण्यासाठी शिवसेनेने बाहय़ा सरसावल्या असतानाच उमेदवारीवरून पक्षातच हाणामाऱ्या होत असल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना रविवारी रात्री सेनेच्या डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेतच पक्षाच्या दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या समर्थकांत बाचाबाची झाली. पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच झालेल्या हाणामारीमुळे सेनेतील दुफळी उघड झाली आहे. त्यामुळे युतीतील बेबनाव मिटवण्यापूर्वी पक्षातील मतभेद मिटवण्याचे आव्हान शिंदे यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर ही असल्याने तिकीट वाटपाच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये शाब्दिक चकमकी झडल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे. रविवारी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक रवी पाटील आणि कल्याण पश्चिम येथील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले विजय ऊर्फ बंडय़ा साळवी एकमेकांशी सरळ भिडले. पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी साळवी यांच्याकडे यंदा निवडणुकीची विशेष जबाबदारी सोपवली असून त्यामुळे कल्याण पश्चिमेतील काही नगरसेवक नाराज आहे. त्याचेच पडसाद रविवारी उमटले. कल्याण पश्चिमेतील पराभवाचे शल्य मनात ठेवून साळवी काही उमेदवारांचे तिकीट कापत आहेत, असा थेट आरोप रवी पाटील यांनी केला. त्यावरून साळवी व पाटील यांच्या शाब्दिक चकमक सुरू झाली. बघता बघता वाद इतका वाढला की दोघांचे समर्थक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्या वेळी तुरळक स्वरूपाची हाणामारी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पाटील आणि साळवी यांना आवरताना एकनाथ शिंदे यांची तारांबळ उडाली. मात्र, इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी या दोघांनाही शांत केल्याचे सूत्रांनी सांगितले.

विजय साळवी हे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत अवघ्या एक हजार मतांनी पराभूत झाले होते. डोंबिवलीच्या तुलनेत कल्याण परिसरात शिवसेनेची ताकद चांगली आहे. या भागातून शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात. तरीही विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने साळवी यांनी याची जबाबदारी पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांवर ढकलली होती. त्यातूनच या वादाला सुरुवात झाली होती. दरम्यान, या संदर्भात साळवी आणि पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करुनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.