चित्रपटातील कलाकारांनी गोंदवलेल्या ‘टॅटू’ना विशेष पसंती

आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवात देवीची आराधना करत गरब्याचे फेर धरणाऱ्या तरुणाईला यंदाही टॅटू प्रकारांचे आकर्षण खुणावू लागले असून मुलींप्रमाणे आता तरुणही यंदा गरब्यासाठी हे सुबक गोंदण गोंदवून घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पुढाकार घेताना दिसत आहे. विविध चित्रपटांमध्ये नायकांनी गोंदवलेल्या टॅटूच्या प्रतिकृतींचा यंदा मोठी मागणी असून ते गोंदवून घेण्याचे दर गेल्या काही वर्षांच्या तुलनेत वाढले आहेत.

कायमस्वरुपी टॅटू काढण्यापेक्षा काही दिवसांपूरते टॅटू काढण्याकडे तरुणाईचा कल जास्त असून यात मुलींची आघाडी असते. असे असले तरी मुलांमध्येही हा ज्वर वाढताना दिसतो आहे. टॅटू शॉपमध्ये तरुणांचा वावर वाढला असून तरुणांच्या सोबतीने नोकरदार वर्गही यात मागे नसल्याचे कलाकार सांगतात. नवरात्रीमध्ये खासकरुन कायमस्वरुपी टॅटू काढण्यापेक्षा काही दिवसांपूरती गोंदवून घेण्याकडे तरुणांचा कल जास्त आहे. नवरात्रीत पाठीवर टॅटू काढण्यास मुलींचे जास्त प्राधान्य असते. त्यासाठी खास बॅकलेस घागरा आणि चोलीची फॅशन निवडण्यात येते. बॅकलेस चोळीमुळे सौंदर्य अधिक खुलून  दिसतेच परंतू टॅटूमुळे त्यात आणखी भर पडते.

टॅटूसाठी खर्च करण्यासाठी तरुणाई तयार असते. हजार रुपयांपर्यंत पैसे मोजण्यास तरुणाई मागेपुढे पहात नाहीत. तात्पुरते टॅटू हे दिडशे रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत काढून मिळतात. तर कायमस्वरुपी टॅटू हे पाचशे रुपयांपासून ते हजार रुपयांपुढे काढून मिळतात. टॅटूच्या आकारमानावर त्याचे पैसे ठरलेले असतात. मुलांमध्ये चित्रपटातील नायकांनी गोंदविलेल्या टॅटूची क्रेझ अधिक  दिसून येते.

कलाकारांची भुरळ

सध्या हर्षवर्धन राणे या नायकाच्या छातीवरील व मानेवरील टॅटू तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे. तर मुलींना दिपिका पादूकोन सारखे मानेवर नावाचे पहिले अक्षर कोरायचे असते. काही मुली सई ताम्हणकरसारखे रोमन भाषेमध्ये नाव गोंदवून घेतात असे कलाकार सुमीत फुलगावकर याने सांगितले. तसेच माऊरी, ट्रायबल या नक्षीलाही जास्त पसंती असून ओम, दांडीया स्टीक तसेच गुजराती पॅटर्नवाले गरबा नृत्याचे टॅटू मुली पाठीवर रंगवून घेतात.

रंगीबेरंगी टॅटूलाही पसंती

मुलामुलींना वेगवेगळे टॅटू हवे असतात. फुलांचे रंगबिरंगी तर राधाकृष्णाचे टॅटू शरीरावर रंगवून घेण्याची स्पर्धाही सध्या जोमाने सुरू आहे. तरुणांमध्ये ‘जगदंब’ हे कॅलिग्राफीमधील नाव शरीरावर कोरून घेण्याचा ट्रेंडही सध्या जोरात आहे. मुली शक्यतो पाठ, कंबर आणि दंडावर टॅटू काढण्यास पसंती देतात तर मुले छाती दंड आणि मानेवर टॅटू काढतात असे कलाकार लवेश वैद्य याने सांगितले. स्किन बेस तसेच फिगर बेस व रंगानुसार टॅटू प्रचलित आहेत. त्वचेनुसार टॅटू हा लिक्विड स्वरूपात येतो. त्यात वॉटर कलरचा वापर करण्यात येतो. हा टॅटू दोन दिवस टिकतो. तसेच काही खास रसायनाचा यात वापर केला तर तो सात दिवसही टिकतो. फिगरबेस टॅटूला मुलींची जास्त पसंती असून तो सहज लावता येतो फक्त तो चिपकण्याची गरज आहे, असे राजेश गावकर याने सांगितले.