ऑनलाइनद्वारे विक्री केलेल्या बेडशीटच्या मालाचे २४ लाख रुपये बुडविले

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती रिपू ऊर्फ राज कुंद्रा यांच्या ‘बेस्ट डिल टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने ऑनलाइनद्वारे विक्री केलेल्या बेडशीटच्या मालाचे २४ लाख रुपये संबंधित व्यापाऱ्याला दिले नसल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्या व्यापाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यासह कंपनीच्या पाच संचालकांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात बुधवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई येथील गोरेगाव परिसरात रवी मोहनलाल भालोटिया (५९) राहत असून त्यांची भिवंडीतील एमआयडीसी परिसरात भालोटिया एक्स्पोर्ट नावाची कंपनी आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या ‘बेस्ट डिल टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने भालोटिया यांच्या कंपनीला ई-मेलद्वारे बेडशीटच्या मालाची ऑर्डर दिली होती. या ऑर्डरप्रमाणे भालोटिया यांनी या कंपनीला बेडशीटच्या मालाचा पुरवठा केला होता. त्यानंतर या कंपनीने या मालाची ग्राहकांना विक्री करून त्यांच्याकडून पैसे घेतले. जुलै २०१५ ते मार्च २०१६ आणि जुलै २०१६ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत हा व्यवहार झाला आहे. १ कोटी ५४ लाख रुपये किमतीच्या बेडशीट खरेदी केल्या होत्या. त्यापैकी १ कोटी २९ लाख ८७ हजार १२३ रुपयांची रक्कम भालोटिया यांना देण्यात आली होती. उर्वरित २४ लाख १२ हजार ८७७ रुपये दिले नाहीत. हे पैसे मिळावेत म्हणून भालोटिया यांनी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला, मात्र त्यानंतरही त्यांना पैसे मिळाले नाहीत. अखेर त्यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.

त्याआधारे कोनगाव पोलिसांनी कंपनीचे संचालक शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, दर्षित शहा, उदय कोठारी आणि वेदांत बाली यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.