बोटी अडवून माशांची लूटमार; पोलिसांना सहकार्य न करण्याचा निर्णयू

सागरी सुरक्षेसाठी मच्छीमारांना ‘पोलीस मित्र’ बनविले गेले. पण या पोलिसांनी आपले ‘मित्र’ असलेल्या या मच्छीमारांची लूटमार करण्यास प्रारंभ केला आहे. गस्तीवरील पोलीस सुरक्षेचे काम करण्याऐवजी मच्छीमारांच्या बोटी अडवून त्यांच्याकडून मासे उकळत आहेत. पोलिसांनी ही लूटमार थांबविली नाही, तर त्यांना यापुढे कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचा इशारा मच्छीमार संघटनांनी दिला आहे.

वसईच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणावर मत्स्यव्यवसाय चालतो. याच समुद्रात पोलिसांतर्फे नऊ स्पीड बोटींद्वारे सागरी गस्त घालण्यात येत असते. परंतु गस्ती पोलीस मच्छीमार बोटींना अडवून त्यांच्याकडील मासे काढून घेतात. चांगल्या प्रतीचे मासे मोठय़ा प्रमाणात ते सतत नेत असतात. गेल्या वर्षी एका मच्छीमाराकडून त्यांच्या बोटीतले मासे पोलिसांनी काढून घेतल्याचे प्रकरण गाजले होते. दोन दिवसांपूर्वी पोशापीर येथे बोटीला अडवून गस्तीवरील पोलिसांनी बोटीचा खलाशी जोनास अप्पा याच्याकडून जबरदस्तीेने बोटीतले मासे काढून घेतले होते. त्याने पोलिसांना विरोध केला तर पोलिसांनी दमबाजी केली. या प्रकरणाचीे तक्रार जोनास यांनी कोळी युवा शक्ती या मच्छीमारांच्या संघटनेकडे केली आहे.

गस्तीवरील पोलीस सतत मच्छीमार बोटींना अडवून त्यांच्याकडून मासे काढून घेत असतात. भीतीपोटी मच्छीमार तक्रोरी करीत नाही, असे कोळी युवा शक्तीचे अध्यक्ष दिलीप माठक यांनी सांगितले. या ठिकाणी बेकायदा रेती उत्खनन होत असते. त्या बोटींकडे नोंदणी नसते. त्यांच्याशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधांमुळे पोलीस त्यांना अडवत नाही. पण गरीब मच्छीमारांची अडवणूक करून मासे काढून घेत असल्याचे माठक यांनी सांगितले.

सध्या वसईसह सर्वच ठिकाणी माशांचा दुष्काळ आहे. मच्छीमार बोटींना एका फेरीचा खर्चही परवडेनासा झाला आहे. त्यातच पोलिसांकडून अशी छळवणूक होत असल्याने ते हवालदिल झाले आहेत. एकीकडे आम्हाला सागरी सुरक्षेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतात आणि दुसरीकडे आमचा छळ सुरू आहे. हे प्रकार थांबले नाहीत तर यापुढे पोलिसांना कुठल्याच प्रकारचे सहकार्य केले जाणार नाही.

दिलीप माठक, कोळी युवा शक्ती