सर्वजण दारूच्या नशेत बरळल्याचे उघड

उरणमध्ये पाच संशयित दहशतवादी घुसल्याच्या चर्चेने आधीच मुंबई धास्तावलेली. त्यात शुक्रवारी रात्री भांडुपहून एका ओला टॅक्सीची ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी नोंदणी झाली. त्या टॅक्सीतही पाचजणच बसले आणि प्रवासात उरणमधल्या दहशतवाद्यांबाबत बोलू लागले. त्यातल्या एकाने तर ‘हॉस्पिटल का जायजा लेंगे और मुंबई में जाकर धमाका करेंगे,’ असे उद्गार काढल्याने टॅक्सीचालकाचा जीवही टांगणीला लागला. त्यांना रुग्णालयात सोडल्यावर टॅक्सीचालकाने थेट पोलीस ठाणे गाठून ही माहिती दिल्यावर पोलिसांची एकच धावपळ उडाली. अखेर हे पाचहीजण दारुच्या नशेत सारे काही बरळल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला!

शुक्रवारी मध्यरात्री भांडुप परिसरातून हे पाचजण एका ओला टॅक्सीत बसले. नोंदणीप्रमाणे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे टॅक्सी निघाली. पण प्रवासभर या पाचजणांचे बोलणे संशयास्पद वाटल्याने टॅक्सीचालक घाबरला. उरणमधून शिरलेले पाचजण हेच असावेत, असा संशय आल्याने त्याच्या धास्तीत वाढ झाली. या पाचहीजणांचे बाह्य़ रूपही संशय वाढविणारेच होते. रुग्णालयाजवळ टॅक्सी आल्यावर एकजण रुग्णालयात गेला तर चौघे रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच थांबले. हे पाहून टॅक्सीचालकाने थेट ठाणेनगर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना सर्व माहिती दिली. त्यानंतर ठाणेनगर पोलिस फौजफाटा घेऊन रुग्णालयात पोहचले. रुग्णालय तसेच आजूबाजूचा परिसर पोलिसांनी पिंजून काढला. रेल्वे स्थानकातही कसून तपास केला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले. अखेर नोंदणीच्या आधारे पोलिसांनी भांडुप गाठून त्या पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी एकाची पत्नी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल असून  तिला भेटण्यासाठी ते रुग्णालयात गेले होते.

‘त्या’ पाचांवर कारवाई

दारुच्या नशेत असल्याने हे पाचजण ही वायफळ बडबड करीत असल्याचे उघड झाले. मात्र या वायफळ बडबडीप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. यामुळे  वायफळ बडबड करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना जरब बसेल, असे ठाणेनगर पोलिस ठाण्यााचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी सांगितले.