रोहित पक्ष्यांना लक्ष्य बनवण्याच्या घटनांत वाढ

ठाणे खाडी परिसरात गुरुवारी जखमी झालेल्या रोहित पक्ष्याला बंदुकीची गोळी लागल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होत आहे. या पक्ष्यावर रुग्णालयात उपचार सुरूअसून रविवारी विक्रोळी खाडी परिसरात पुन्हा रोहित पक्ष्यावर बंदुकीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने पक्षीप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. या पक्ष्यांपैकी ठाणे खाडीत आढळलेल्या पक्ष्याच्या पंखाचे हाड मोडले असल्याने काही दिवसांनी या पक्ष्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पक्ष्यावर उपचार करणाऱ्या डॉ. रीना देव यांनी सांगितले. खाडीकिनारा परिसरात पाहुण्या पक्ष्यांवर झालेल्या या हल्ल्यांमुळे खाडीकिनारा भागातील अनैतिक कृत्ये पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

ठाणे खाडी परिसरात जखमी झालेल्या रोहित पक्ष्यावर एसपीसीए रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी या पक्ष्याला उपचारासाठी वांद्रे येथील डॉ. रीना देव यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पक्ष्याच्या पंखाच्या क्ष-किरण अहवालातून बंदुकीची गोळी लागल्याचे निष्पन्न झाल्याने या पक्ष्याची परिस्थिती गंभीर असल्याचे रीना देव यांनी सांगितले. ठाणे खाडीतील पक्ष्यावर रुग्णालयात उपचार सुरूअसतानाच रविवारी विक्रोळी येथील गोदरेज कॉलनी खाडीकिनारी कोळी बांधवांना जखमी अवस्थेतील रोहित पक्षी आढळला. गोदरेज कॉलनीतील सुरक्षारक्षकांनी पक्षीप्रेमींना या पक्ष्याची माहिती दिल्यावर पक्षीप्रेमींनी पक्ष्याला रीना देव यांच्या रुग्णालयात दाखल केले. या पक्ष्याच्याही पंखाला बंदुकीची गोळी लागल्याने रविवारी या पक्ष्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली. एकाच आठवडय़ात दोन रोहित पक्ष्यांवर प्राणघातक हल्ला झाल्याने खाडीकिनारी वनविभागातर्फे योग्य सुरक्षा असावी अशी मागणी पर्यावरणवादी संस्थांकडून केली जात आहे. या घटनांविषयी माहिती घेण्यासाठी रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्ड लाइफ वेलफेअर (रॉ) या संस्थेच्या पवन शर्मा यांनी पक्षीनिरीक्षकांशी चर्चा केली असता या परिसरात बंदुकीच्या गोळीचा आवाज अनेकदा ऐकायला मिळत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. बंदुकीच्या गोळीचा आवाज झाल्यावर खाडीकिनारी शांत विहार करणारे रोहित पक्षी जीव वाचवण्यासाठी समूहाने उडतात, अशी माहिती पक्षीनिरीक्षकांनी दिली.

सुरक्षेसाठी वनविभागाचा पुढाकार महत्त्वाचा

ठाणे खाडी परिसराला फ्लेमिंगो सेंच्युरी जाहीर करण्यात आले आहे. दिवसेंदिवस खाडीकिनारी घडणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक तसेच पाहुण्या पक्ष्यांचे आयुष्य धोक्यात आले असून खाडी किनारपट्टीच्या पक्ष्यांची श्रीमंती संपुष्टात येईल. वनविभागाने सुरक्षेच्या दृष्टीने पुढाकार घेतला पाहिजे. वन्यजीव संस्था, पर्यावरण संस्था आणि स्थानिक नागरिक यांच्याशी वनविभागातील कांदळवनविभागाने संलग्न राहून खाडीकिनाऱ्याची जैवविविधता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया रॉ संस्थेचे पवन शर्मा यांनी दिली.

खाडीकिनारपट्टीतील जैवविविधता टिकावी म्हणून वन विभागातर्फे विविध योजना राबविल्या जात असतात. यापूर्वी रोहित पक्ष्याच्या बाबतीत अशा घटना वनविभागाकडे नोंदवण्यात आल्या नाहीत. मात्र या घटनेनंतर खाडीकिनारची सुरक्षा वाढवणार आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्षन अ‍ॅक्टच्या माध्यमातून तपास करणार असून हल्ला करणाऱ्या व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

– एन. वासुदेवन – मुख्य वनसंरक्षक, कांदळवन विभाग