मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही पुनर्वसन रखडलेलेच

बारवी धरणाची उंची वाढवल्यानंतर स्थलांतरित करणे आवश्यक असलेल्या सात गावांपैकी तोंडली गावात अखेर रविवारी पाणी शिरले तर जांभूळवाडी- बुरुडवाडी पाडय़ापासून अवघ्या काही फुटांवर धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे पाणी आले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही सर्व गावे पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून त्यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनामुळे गेल्या दहा वर्षांपासून बारवीच्या तिसऱ्या टप्प्याचे विस्तारीकरण रखडले आहे. त्यात अतिरिक्त पाणीसाठा करण्यासाठी तोंडली, काचकोळी, जांभूळवाडी, मोहेघर, कोळेवडखळ, मानिवली आणि सुकाळवाडी या सात गावांचे पुनर्वसन करणे आवश्यक झाले आहे. यंदाच्या पावसाने जुलै महिन्यातच शंभर टक्के भरले असले तरी पुनर्वसन रखडल्याने जादा पाणीसाठा होणार नाही. रविवारी अखेर वाढलेल्या पावसाने सात गावांपैकी तोंडली गावातील काही घरांत पाणी शिरण्यास सुरुवात झाली. येथील ग्रामस्थ कांता बांगर, मंगल आगीवले आणि पुंडलिक बांगर यांच्या घरात रविवारी अखेर पाणी शिरले तर जांभूळवाडी येथील पाण्याची पातळी पाहता येत्या काही तासांत तिथेही पाणी शिरण्याची शक्यता आहे. काचाकोळी येथून म्हसा येथे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे काचकोळीच्या ग्रामस्थांना मोठा फेरा मारून जावे लागत आहे. त्यात पुनर्वसनात दिरंगाई करणाऱ्या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांमुळे त्रासलेल्या ग्रामस्थांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना गावात बंदी घातली आहे.

जोपर्यंत धरणग्रस्तांना नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना गावात पाय ठेवू देणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केल्याने प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर जांभूळवाडी गावात पाणी आणि विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यात वाढ झाल्याने जांभूळवाडी येथील एक कूपनलिका आणि विहीर पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना दुसऱ्या वाडीतून पायपीट करत किंवा पाण्यातून बोटीच्या साहाय्याने पाणी आणावे लागते आहे. त्यात केव्हाही पाण्याची पातळी वाढून पाणी घरात शिरण्याची शक्यता असल्याने भीतीपोटी येथील पुरुष मंडळी रोजगार बुडवून घरीच राहत असल्याचे जानू पारधी सांगतात. दुसऱ्यांदा होणाऱ्या पुनर्वसनामुळे आम्ही विटलो असून आमचे आयुष्य अस्थिर झाल्याचे येथील सुमन बांगार सांगतात. दोन भागांत विभागलेले तोंडली गाव एका छोटय़ा पुलाने जोडले गेले असून वाढत्या पाण्यामुळे हा छोटासा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यासह येथील प्राथमिक शाळा आणि रस्ता पाण्याखाली गेल्यास गावाचा शहराशी संपर्क तुटेल. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी तहसीलदार सचिन चवधर यांना केली. तोंडली गावात शिरलेल्या पाण्याची पाहणी करण्यासाठी आमदार, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक यांनी गावाला भेट दिली होती.