शहराच्या मध्यवर्ती भागातील शहाड उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम काही दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे, परंतु त्यासाठी प्रवाशांची रोज सकाळ आणि रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या कोंडीत मोठी घुसमट होत आहे. मुरबाड ते कल्याण शहराला जोडणारा हा महत्त्वाचा उड्डाण पूल आहे. यावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. सर्व प्रकारची वाहने याच पुलावरून येजा करीत असल्याने मुरबाडहून पाऊण तासात होणारा कल्याणचा प्रवास सुमारे दीड ते दोन तासांचा होऊ लागला आहे.   
याच वाहतूक कोंडीचा फटका एका रुग्णाला बसला आहे. या रुग्णाला रुग्णालयात पोहचण्यास वाहतूक कोंडीमुळे उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, असा आरोप या रुग्णाच्या नातेवाइकांकडून करण्यात आला आहे. शहाड उड्डाण पुलाची दुरुस्ती २८ वर्षांनंतर प्रथमच करण्यात येत असल्याने या कामासाठी सुमारे दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे, असे  राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांकडून सांगण्यात आले. १९८८ मध्ये शहाड उड्डाण पूल बांधण्यात आला. पुलावर वाहनांचा बोजा पडू नये म्हणून पुलाला ३२ खांब आणि ३२ जोड देण्यात आले होते. अनेक वर्ष देखभाल नसल्याने पुलाचे जोड खराब झाले आहेत. मुरबाड, उल्हासनगर शहरात जाण्यासाठी व कल्याणकडे येणारा हा एकमेव मार्ग आहे.
इतर मार्गासाठी वळण रस्ता, इंधन खर्चीक असल्याने वाहन चालक त्या रस्त्याने जाण्यास तयार नाहीत. शहाड उड्डाण पुलावरून एका बाजुला दुरुस्तीचे काम सुरू आहे, तर दुसऱ्या भागातून एकेरी मार्गावरून वाहनांची येजा सुरू आहे. मुरबाड, उल्हासनगरकडून येणाऱ्या वाहनांची कोंडी होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. ते वाहन पुलावर येण्यास अर्धा ते एक तास लागतो. तेच वाहन कल्याण शहराच्या अंतर्गत भागात पोहचण्यासाठी एक ते दीड तास लागत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येते. जोपर्यंत दोन्ही बाजूची वाहने एकेरी मार्गावरून पुढे जात नाहीत, तोपर्यंत बिर्ला गेट, पौर्णिमा सिनेमागृह, सिंधीगेट, मुरबाड रस्ता, स्टेट बँक भागात अभूतपूर्व वाहतूक कोंडी या भागात असते. मुख्य रस्त्याच्या लगतचे गल्लीबोळ या वाहतूक कोंडीने गजबजून गेलेले असतात. दोन्ही बाजूला वाहतूक पोलीस नियोजन करीत असतात. पण पर्यायी रस्ता नसल्याने कोंडी सोडवण्यापलीकडे काहीही करणे त्यांना शक्य होत नाही, असे चालकांचे म्हणणे आहे.
उल्हासनगर शहरात प्रवेश करताना रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले ठाण मांडून बसलेले असतात. हे फेरीवाले हटवले तरी वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होईल. पण कल्याण आणि उल्हासनगर महापालिका प्रशासन या फेरीवाल्यांवर कारवाई करीत नसल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. दुरुस्तीचे काम रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत करावे, उर्वरित काळ पूल वाहतुकीसाठी खुला ठेवण्याची नागरिकांची मागणी आहे.

वृद्धाचा मृत्यू
गौरीपाडा भागात राहणाऱ्या, रेल्वेतून निवृत्त झालेल्या रमेश मोरे (६८) यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने कल्याणमधील रेल्वे रुग्णालयात रिक्षेमधून नेण्यात येत होते. मुरबाड रस्ता परिसरात वाहतुकीची कोंडी असल्याने त्यांना रुग्णालयापर्यंत पोहचण्यास जागाच मिळाली नाही. कोंडीमध्ये ४० मिनिटे रिक्षा अडकून पडल्याने त्यांचा रिक्षेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची माहिती मोरे कुटुंबीयांनी दिली. मोरे यांना तात्काळ उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. पालिका प्रशासन, वाहतूक पोलीस यांच्या दिरंगाईचा फटका मोरे यांना बसला असल्याची टीका कल्याणमध्ये होत आहे.