ठाकुर्लीतील प्रवाशांची धोकादायक पायपीट

एकीकडे पादचारी पुलांचा अभाव असल्याने किंवा त्यातील त्रुटींबद्दल प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या नावाने खडे फोडत असतानाच, रूळ ओलांडण्याची मानसिकता प्रवाशांमध्येही रुजल्याचे दिसून येत आहे. ठाकुर्ली स्थानकाचा कायापालट करून या ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही या स्थानकात ये-जा करणारे प्रवासी पूर्वीप्रमाणेच रेल्वे रुळांवरून मार्गक्रमण करीत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सातत्याने पादचारी पूल तसेच इतर मूलभूत सुविधांची मागणी करण्यात येत होती. अखेर गांधी जयंतीच्या दिवशी ठाकुर्ली स्थानकात कल्याणच्या दिशेने पादचारी पूल, सरकते जिने त्याप्रमाणे नवीन तिकीट घर कार्यान्वित करण्यात आले. फक्त दोन फलाट असणाऱ्या ठाकुर्ली स्थानकावर नव्याने पादचारी पूल बांधण्यात आला आहे. अनेक वर्षे ठाकुर्ली स्थानकामधील प्रवाशांमध्ये सुविधांच्या अभावामुळे नाराजीचे वातावरण होते; परंतु पादचारी पूल, तिकीट घर, प्रसाधनगृह अशा अनेक नवीन सुविधांमुळे ठाकुर्लीकरांना दिलासा मिळाला आहे.

सकाळच्या गर्दीच्या वेळेत डोंबिवली रेल्वे स्थानकात गर्दी असल्याने अनेक प्रवासी गाडी पकडण्यासाठी या स्थानकात येतात. त्यामुळे या स्थानकामध्ये प्रवाशांची चांगलीच वर्दळ असते. फलाटावर फक्त डोंबिवली दिशेकडे एकच पादचारी पूल असल्याने अनेक प्रवासी फलाटाच्या कल्याण दिशेकडील टोकावरून रेल्वे रूळ ओलांडतात. पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला झाल्यानंतर रूळ ओलांडण्याचे प्रकार बंद होणे अपेक्षित होते. मात्र सुरक्षित पर्याय असूनही प्रवासी धोक्याचा मार्ग पत्करीत आहेत.

ठाकुर्ली स्थानकातील जुना पादचारी पूल नव्या फलाटांना जोडण्यात येईल. पूर्व विभागात पादचारी पूल जिथे उतरतो, तिथे असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात येतील.

– संजय गुप्ता, मुख्य वाणिज्य निरीक्षक, मध्य रेल्वे