देशाला हादरवून सोडणाऱ्या पेट्रोल पंपावरील घोटाळ्याप्रकरणी प्रकाश नूलकर याला काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी अटक केली. चौकशी दरम्यान त्याने तब्बल ४० वेळा परदेशवारी केल्याचे समोर आले आहे. यात तो तब्बल २५ देशांत भ्रमंती करुन आला आहे.  त्यामुळे भारतातील पेट्रोल पंपावरी फेरफारी प्रकरणात परदेशी कनेक्शन असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी सखोल तपास करत आहोत, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली. प्रकाश नूलकर यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाणे ११ जुलै रोजी अटक केली होती. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पेट्रोल पंपाच्या फेरफारप्रकरणी राज्यातील १७ जिल्ह्यातील ११८ पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ६९ पंपामध्ये जास्त प्रमाणत फेरफार झाल्याच समोर आले.

पेट्रोल पंपावर फेरफार करून ग्राहकांची फसवणूक करणात मास्टर माईंड असणाऱ्या प्रकाशने आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. कर्नाटक राज्यातील हुबळी येथून त्याला अटक केल्यानंतर या घोटाळ्याची आंतरराष्ट्रीय बाजारात पाळेमोळे पसरले असल्याची शक्यता ठाणे पोलिसांनी वर्तवली होती. त्यानुसार प्रकाश नूलकर तब्बल ४० वेळा परदेशीवारी केल्याचे तपासात समोर येत आहे. यात त्याने तब्बल २५ देशांत भ्रमंती केली आहे. या परदेश दौऱ्यात तो अनेकदा चीनला गेल्याची माहिती समोर येत आहे. नूलकर हा मिडको म्हणजेच पेट्रोलियम मशीन बनविणाऱ्या कंपनीत १३ वर्ष नोकरी केलेली असल्याने मशीनमध्ये पल्सर युनिट सारख्या चिप्स सेट करणे त्याला सोपे जात होते. नूलकर हा मुंबईतील लोअर परेल येथे राहायला होता.

पेट्रोल चोरी प्रकरणात राज्यात सर्वाधिक चिप्स लावण्यात नूलकर हा अग्रेसर होता. अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या माघावर होते. मात्र लोकेशन आणि फोनचे सिमकार्ड वारंवार बदलत असल्याने तो ठाणे पोलिसांच्या तावडीतून धारवाडला पसार झाला होता. नूलकर पेट्रोल पंपावरीस डिव्हाईस टेक्निशियनच्या साहाय्याने बदलत होता. तर इतर जिल्ह्यात मारुती नावाच्या कुरियरद्वारे हे डिव्हाईस इतर ठिकाणी पुरवले जायचे. पेट्रोल पंपावर फेरफार प्रकरणात वापरण्यात आलेले डिव्हाईस हे चीनमधून मागवल्याचे तपासातून समोर आले आहे. देशातील विविध पेट्रोल पंपावर कुरिअरद्वारे डिव्हाईसची मागणी करुन टेक्निशियनच्या साहाय्याने ते पेट्रोलपंपावर सेट केले जायचे. डिव्हाईसच्या बदल्यात नूलकर पेट्रोल पंप मालकाकडून एकदम २५ ते ५० हजाराच्या घरात रक्कम घेत असे किंवा प्रत्येक महिन्याला ३ ते ५ हजार रुपये घेत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.