नव्या पिढीला महाराष्ट्राची किल्ले परंपरा अवगत व्हावी व त्यामागील इतिहास न्यात व्हावा यासाठी क्षितिज संस्था दुर्गसंवर्धन व दुर्गभ्रमण क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. या संस्थेच्यावतीने डोंबिवलीत गेली पाचहून अधिक वर्षे डोंबिवली आणि ठाकुर्ली परीसरात किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करत आहे. यंदाही किल्ले बांधणी स्पर्धेला उत्स्र्फुत प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा चार टप्प्यात घेतली जाते. या स्पर्धेपूर्वी स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी किल्ले बांधणीचे शिबिर घेण्यात येते. यात किल्ला कसा बांधावा, बांधताना कशाचा वापर करावा, कोणत्या गोष्टींचा वापर टाळावा, किल्लय़ाचे भाग कसे दाखवावेत या संबंधी स्पर्धकाना मार्गदर्शन केले गेले. किल्ला इको फ्रेंडली असावा यावर भर दिला गेला.
यावर्षी ट्रेक क्षितिज संस्थे तर्फे आयोजित केलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेत ६२ किल्ले बनवणाऱ्या गटांनी भाग घेतला होता. ट्रेक क्षितिजच्या सदस्यांकडून ५ गट बनवून ६२ किल्लय़ांचे परिक्षण केले. यामध्ये भाग, सजावट, इतिहास, परिसराची, स्वच्छता यावर आधारीत गुण देण्यात आले. छोटय़ा मुलांचा एक आणि मोठय़ा मुलांचा एक अशा दोन गटात ही स्पर्धा पार पडली. लहान गटामध्ये संकेश्वर नगर, डोंबिवली (पू) येथील गटाच्या ‘सिंधुदुर्ग’ किल्याला प्रथम, विवेकानंद सोसायटी, सारस्वत कॉलनी, डोंबिवली (पू) येथील ‘रामशेज’ किल्ल्याला द्वितीय, तर एकता मित्र मंडळ, नांदिवली गटाच्या ‘शिवनेरी’ किल्ल्याला तृतीय पारितोषिक देण्यात आले. मोठय़ा गटामध्ये विवेकानंद सोसायटी, सारस्वत कॉलनी, डोंबिवली (पू.) यांच्या ‘साल्हेर’ किल्ल्याला प्रथम आणि येथील ‘नळदुर्ग’ किल्ल्याला द्वितीय पारितोषिक देण्यात आले. तसेच अरुण सोसायटी, शास्त्री नगर , डोंबिवली (प.) यांच्या ‘नळदुर्ग’ किल्ल्याला तृतिय पारितोषिक देण्यात आले.
किल्ले बांधणी स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना प्रत्यक्षात किल्ला पाहण्याची संधी मिळावी यासाठी त्यांच्यासाठी विनामुल्य ट्रेकचे आयोजन केले जाते. यावर्षी स्पर्धकांसाठी सिंहगड किल्याची सफर २२ नोव्हेंबरला रोजी आयोजित करण्यात आली आहे. इतिहास तज्ञ श्रीदत्त राऊत यांचे मार्गदर्शन या ट्रेकला लाभणार आहे.