जागा मालक, लॉज चालकांचा समावेश; अन्य साथीदार फरार

ठाण्यातील सत्यम लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची तक्रार ठाणे महापालिकेने रविवारी दिल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने चौघांना अटक केली असून त्यामध्ये दोन जागेचे मालक असून अन्य दोघेही लॉज चालक असल्याचे स्पष्ट झाले आहेत. लॉज चालवणारे अन्य दोघे फरार असून पोलीस त्यांचा तपास घेत आहेत. लॉज मालक किशोर भाटिया (५७), दिलीप भाटिया (५६) यांच्यासह मंजे गोवडा (३८) आणि जनार्धन पुजारे या लॉज चालकांचा समावेश आहे. ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंत्यांनी रविवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.

ठाणे महापालिकेच्या अनधिकृत बार आणि लॉजच्या कारवाईदरम्यान गुरुवारी उपवन परिसरातील सत्यम लॉजच्या २९० खोल्यांतील कुंटणखान्याचे वास्तव उघड झाले होते. या लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले होते. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले होते. रविवारी महापालिकेचे वर्तकनगर प्रभाग समितीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पवार यांनी वर्तकनगर पोलिसांकडे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची तक्रार दाखल केली. सत्यम या लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू केला होता. या प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटच्या पथकाने कारवाई करत रविवारी सायंकाळी या लॉजचे मालक किशोर भाटिया आणि दिलीप भाटिया यांना अटक केले, तर या लॉज चालवणारे मंजे गोवडा आणि जनार्धन पुजारे यांनाही पोलिसांनी अटक केली.

पुढील तपास अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध विभागाच्या पथकाकडे

लॉज चालवणाऱ्या गोवडा आणि पुजारे यांचे अन्य दोन साथीदार फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. रविवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींना ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध विभागाच्या पथकाकडे सोपवण्यात आला आहे.