आरोपी कर्नाटकमध्ये सापडल्याने प्रकरणाची उलटतपासणी सुरू

कळवा येथील घोलाईनगर परिसरातील एका विवाहितेच्या घरात शिरून मुलांदेखतच तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी तीन आरोपींना कळवा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली आहे. तर घटनेच्या पाच तासांनंतर उर्वरित तीन आरोपी कर्नाटक राज्यातील मूळगावी सापडले असून त्यांना तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने कळवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असे असले तरी अवघ्या पाच तासांत ठाण्याहून कर्नाटक राज्यात पोहोचणे शक्य नसल्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणाची उलटतपासणी सुरू केली आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

कळवा येथील घोलाईनगर परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहितेच्या घरात रविवारी सायंकाळी सहा जण शिरले. त्यांपैकी दोघांनी तिच्या मुलांची तोंडे दाबून ठेवली तर दोघांनी पीडित महिलेचे हातपाय पकडले होते. उर्वरित दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. तसेच बलात्कारादरम्यान आरोपींनी अ‍ॅसिड हल्ला केल्याने छातीला जखम झाल्याचा दावा पीडित महिलेने केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. बागवान यांच्या पथकाने तीन आरोपींना घोलाईनगरमधून रविवारी रात्री अटक केली. त्यामध्ये गोपाळ कल्लीम शंकर, शंकू शेखर आणि रंगप्पा आशाप्पा बातकाई या तिघांचा समावेश आहे. तर घटनेच्या पाच तासांनंतर उर्वरित तीन आरोपी कर्नाटक राज्यातील मूळगावी सापडले असून त्यांना तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने कळवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तिघा आरोपींची छायाचित्रे पोलिसांनी पीडित महिलेला दाखविली असून तिनेही हेच आरोपी असल्याचा दावा केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  • घटनेच्या पाच तासांनंतर उर्वरित तीन आरोपी कर्नाटक राज्यातील मूळगावी सापडले आहेत. त्यामध्ये बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीचा समावेश आहे. मात्र, अवघ्या पाच तासांत ठाण्याहून कर्नाटक राज्यात पोहचणे शक्य नसतानाही हे तिघे आरोपी तिथे सापडल्याने कळवा पोलीस चक्रावून गेले आहेत. त्यामुळे कळवा पोलिसांचे पथक त्या ठिकाणी प्रत्यक्ष खातरजमा करण्यासाठी रवाना झाले आहे.
  • तसेच या प्रकरणातील एका आरोपीच्या पत्नीवर पीडित महिलेच्या पतीने यापूर्वी अ‍ॅसिड हल्ला केल्याची बाब तपासात समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे कळवा पोलिसांनी या प्रकरणाची आता उलटतपासणी सुरू केली असून त्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.