कार्यकर्त्यांकडून नियमांची पायमल्ली; पं. दीनदयाळ रस्त्यावर नागरिकांची अडवणूक

पालिका प्रशासनाच्या परवानगीची वाट न पाहता काही अतिउत्साही मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी भर रस्त्यात मंडप घालण्याचे प्रकार सुरू केले आहेत. डोंबिवली पश्चिम विभागात पंधरा दिवसांपूर्वी खुल्या करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ या नव्या कोऱ्या सीमेंट रस्त्यावर दोन मंडप उभारण्यात आले आहेत. नव्या रस्त्यावर उभारण्यात आलेल्या या मंडपांमुळे गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधीपासूनच वाहतुकीस अडथळा होत असून पालिकेने या मंडळांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दीनदयाळ रस्त्यावरील रेतीबंदर चौक ते आनंदनगर उद्यान यांच्या मध्यभागी ४० फुटाच्या अंतराने हे दोन मंडप पालिकेच्या परवानग्या न घेताच उभारण्यात आले आहेत. रस्त्यात उभारण्यात आलेले हे मंडप विष्णुनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत. पालिकेच्या ‘ह’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी, अभियंते नियमित या रस्त्यावरून ये-जा करतात. त्यांना ही बेकायदा मंडप उभारणी दिसत नाही का, अशी विचारणा या भागातील रहिवासी करीत आहेत.

उद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या मंडपाने पदपथ आणि अर्धा रस्ता काबीज केला आहे. तेथून जवळच असलेल्या कृष्ण कुटीर इमारतीजवळ उभारण्यात आलेला मंडपदेखील रस्ता अडवून उभारण्यात आलेला आहे. दीनदयाळ रस्ता सीमेंट काँक्रीटचा करण्यात आल्याने या रस्त्यावर या वेळी मंडप उभारणीला परवानगी देण्यात येणार नाही, असे रहिवाशांना वाटले होते. मात्र त्यांचा अंदाज आणि पालिकेचे नियम धाब्यावर बसवून मंडप थाटण्यात आला आहे. या रस्त्यावरून शाळेच्या बस, रिक्षा, खासगी वाहने यांची सतत वर्दळ असते. मंडप उभारण्यात आल्यामुळे या वाहतुकीस अडथळा येऊ लागला असून अजून किमान महिनाभर या कोंडीतून जावे लागणार, या विचाराने वाहनचालक व प्रवासी वैतागले आहेत.

पालिकेची गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्याची प्रक्रिया १३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पालिका, पोलीस, अग्निशमन, महावितरण, वाहतूक विभाग अशा सर्व परवानग्या मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यातून या परवानग्यांचे गणेश मंडळांना वाटप करण्यात येणार आहे. या वेळी मंडप उभारणी सुरू असतानाच, मंडप योग्य आकारात उभारले जातात की नाही यासाठी पोलीस, पालिका, वाहतूक कर्मचाऱ्यांची भरारी पथके भेट देणार आहेत. गणेशोत्सव मंडळांनी मंडप किती आकारात उभारला आहे याची जम्बो झेरॉक्स मंडपाच्या प्रवेशद्वारावर लावावी. त्यामुळे मंडळाने मंडप उभारणी करण्याच्या कायद्याचे पालन केले आहे की नाही हेही रहिवाशांना कळेल, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पं. दीनदयाळ रस्त्यावरील बहुतांशी सीमेंटची कामे पूर्ण करण्यात आली आहे. रस्ता सुस्थितीत राहील याची काळजी घेण्यात येत आहे. गणेशोत्सव मंडळांनी सीमेंट रस्त्यावर मंडप उभारण्यासाठी खांब पुरण्यासाठी खोदाई करू नयेत, अशा सक्त सूचना आहेत. कोणत्याही मंडळाने खोदकाम केल्याचे आढळून आल्यास संबंधितांची मंडप परवानगीबाबत पुनर्विचार केला जाईल आणि संबंधितांवर रस्त्याची खराबी केली म्हणून कारवाई करण्यात येईल.

प्रमोद मोरे, उपअभियंता, कडोंमपा

पं. दीनदयाळ रस्त्यावरील मंडप उभारणीच्या कामास स्थगिती देण्यात आली आहे. परवानगी मिळाल्याशिवाय रस्त्यावर मंडप उभारणी करू नये असे आदेश संबंधित गणेशोत्सव मंडळाला दिले आहेत. तरीही त्यांनी मंडप उभारणी सुरू ठेवली असेल तर त्यांना योग्य ती तंबी तातडीने देण्यात येईल. आपण स्वत: घटनास्थळी जाऊन संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांशी बोलतो.

अरुण वानखेडे , प्रभाग अधिकारी, ह प्रभाग, कडोंमपा