व्यवस्थापन यंत्रणेचा अभाव, अपुरी जागा यामुळे विल्हेवाटीचा प्रश्न

‘स्मार्ट’ होण्याची स्वप्ने बाळगून स्वच्छतेचा वसा घेऊ पाहणाऱ्या मुंबई महानगर प्रदेशातील शहरांना त्यांच्या कचऱ्याचा प्रश्न मात्र अद्याप धडपणे सोडविता आलेला नाही. एकीकडे चंगळवादी संस्कृती अंगीकारलेल्या शहरांतून प्रचंड प्रमाणात कचरा निर्माण होत असताना या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारी यंत्रणा उभारण्यात मात्र अपयश येत आहे. त्यातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीच्या जागा अत्यंत अपुऱ्या पडू लागल्या असून या कचराभूमींच्या परिसरात लोकवस्ती वाढू लागल्याने तेथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. मुंबईचा कचरा ठाण्याच्या वेशीवर, ठाण्यातला कचरा दिव्यात, कल्याण-डोंबिवलीचा कचरा क्षमता संपलेल्या आधारवाडीत टाकला जातो. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या तिन्ही शहरांमध्येही कोणतीही प्रक्रिया न करता कचरा कचराभूमींवर टाकला जात आहे.

कचराभूमी परिसरातील नागरिकांना अहोरात्र दरुगधीचा त्रास सहन करावा लागतो. दिवसा माशा तर रात्री डास यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य कायम धोक्यात असते. कचऱ्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित पालिका प्रशासन पुरेशा सुविधा देत नाहीत. त्यामुळे जीव धोक्यात घालूनच त्यांना काम करावे लागते.

मुलुंड येथील मुंबईच्या कचराभूमीची कचरा सामावून घेण्याची क्षमता ६,५०० मेट्रिक टन आहे. मात्र इथे प्रत्यक्षात त्यापेक्षा किती तरी जास्त म्हणजे ११ हजार मेट्रिक टन कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे ठाणे पूर्व विभागातील हरिओम नगरवासीयांना कायम त्रास सहन करावा लागतो. ठाण्यातील तब्बल ४०० मेट्रिक टन कचरा दिव्याजवळील खर्डी येथे आणून टाकला जातो. या कचराभूमीची क्षमता आता संपल्यात जमा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच ठाण्यातील एवढा कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कल्याण-डोंबिवलीतील ६५० टन कचरा क्षमता संपलेल्या आधारवाडीतच आणून टाकला जात आहे. त्यामुळे इथे कचऱ्याचा भला मोठा डोंगर तयार झाला आहे. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्येही कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे.