बागकामासाठी ‘गृहपाठ’ आवश्यक
‘कुंडीतील झाडे कार्यालय / घर अशा बंदिस्त जागेतील हवा किती शुद्ध करतात?’ याचं उत्तर आहे – ‘अगदी उंच पर्वतावर जेवढी शुद्ध हवा असते तेवढी.’ हे प्रत्यक्षात आणलेले आपण पाहू शकतो दिल्लीतील पहारपूर इंडस्ट्रीजमध्ये. दिल्ली हे सर्वात जास्त प्रदूषण असलेलं शहर, मात्र पहारपूर इंडस्ट्रीजच्या सहा मजली इमारतीमधील हवा पर्वतावरील शुद्ध हवेइतकी शुद्ध आहे. हवा शुद्ध करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रमाणात कुंडीतील झाडांचा वापर केला आहे. बििल्डगची गच्ची अगणित कुंडीतील झाडांनी भरलेली आहे. तसेच बििल्डगमध्ये माणशी चार कुंडय़ा या प्रमाणात कुंडीतील झाडे ठेवली आहेत. त्यात प्रामुख्याने स्नेक प्लांट (सर्पपर्णी), पीस लिली, अरेका पाम आणि मनी प्लांटचा समावेश आहे. गच्चीवरील झाडांमधून सक्र्युलेट केलेली हवा वातानुकूलित यंत्रणाद्वारे सर्व इमारतभर फिरवलेली आहे. ‘ग्रो फ्रेश एअर’ असंच तिथे म्हंटलं जातं आणि खरं आहे ते. भारतातल्या ‘ग्रीन बििल्डग’मध्ये या बििल्डगचा समावेश आहे. ‘ग्रीन बििल्डग’ ही एक वेगळी संकल्पना आहे, ज्यात झाडं हा एक घटक असतो.
मी स्वत: दिल्लीला पहारपूर इंडस्ट्रीजमध्ये जाऊन हे सर्व बघितलं आहे. कुंडीतील झाडांची अशी योजना कशी अमलात आली हे सांगताना कंपनीचे संचालक वरुण अग्रवाल यांनी त्यांच्या सासऱ्यांची गोष्ट सांगितली. त्यांचे सासरे कमल मित्तल यांना दिल्लीतील प्रदूषणामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मात्रं व्यवसायामुळे दिल्ली तर सोडायची नव्हती. तेव्हा त्रासावर उपाय शोधताना त्यांना ‘कुंडीतील ठरावीक झाडे’ हे उत्तर मिळालं आणि त्यांनी ते अमलात आणलं. हा उपाय फक्त स्वत:पुरता मर्यादित न ठेवता, कंपनीतल्या सर्वासाठीच उपयोगी पडेल या दृष्टीने त्यांनी उपाययोजना केली आणि इमारतीभर कुंडीतील झाडे दिसू लागली. जास्तीत जास्त कुंडीतील झाडांचा वापर करून आपण आपल्या घरातील /कार्यालयामधील हवा फ्रेश राखू शकतो. याचा लगेच दिसणारा परिणाम म्हणजे कंटाळा कमी होतो आणि कामातील उत्साह वाढतो.
मग ‘आपल्या गृहवाटिकेत कोणती झाडे हवीत?’ स्नेकप्लांट, पीस लिली, अरेका पाम आणि मनी प्लांट ही तर नक्कीच हवीत. याव्यतिरिक्त कोणती झाडं लावावीत? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी थोडा होमवर्क करावा लागेल. प्रत्येकाच्या आवडीनुसार झाडांची निवड बदलेल. यासाठी, ‘आपल्याला कशासाठी झाडं लावायची आहेत?’ या प्रश्नाचं उत्तर ठरवावं लागेल. उत्तर पुढीलपैकी एखादं असू शकेल.
१) घर सुंदर दिसण्यासाठी
२) फुलांसाठी
३) घरगुती औषधांसाठी
४) स्वयंपाकात वापरता येण्याजोगी
५) कोणतीही चालतील इत्यादी.
यातील ‘कोणतीही चालतील’ असं जरी उत्तर असलं तरी ‘झाडांना आपलं घर मानवणार आहे की नाही’ याचा विचार झाडाची निवड करताना झाला पाहिजे. कुंडीत झाडं लावताना, सर्वसाधारणपणे हा विचार अजिबात केला जात नाही. नर्सरीत झाडं विकत आणायला गेल्यावर, तिथे जी झाडं आपल्याला आवडतात ती घेतली जातात. घरी आणल्यावर काही महिन्यांनी झाडाला फुलं येईनाशी होतात किंवा झाडाचं आरोग्य बिघडतं. शेवटी ते झाड मरूनही जातं. असं झाल्यावर पुन्हा नर्सरीत जावं लागतं. दोन-तीन वेळा असा अनुभव आल्यानंतर ‘बागकाम आपल्याला जमत नाही’ किंवा त्याही पुढे जाऊन, ‘आपल्या हाताने झाड जगत नाही’ अशी गैरसमजूत करून घेतली जाते आणि आपल्या बागकामाच्या छंदाला कायमचा विराम मिळतो. हे सर्व टाळण्यासाठी झाडांची निवड करतानाच ती योग्य रीतीने केली आणि कुंडीतील झाडांची निगा कशी राखायची याची थोडी माहिती झाली तरी आपली गृहवाटिका छान ताजीतवानी दिसेल आणि आपण तिचा आनंद घेऊ शकू.
‘झाडांना आपलं घर मानवणार आहे की नाही’ याच्या उत्तरासाठी सर्वसाधारणपणे ग्रील, गच्ची किंवा आजुबाजूच्या जमिनीवर आपण कुंडीतील झाडे वाढवणार आहोत असं गृहीत धरू या. यातल्याच कुंडय़ा आपण घरातील दिवाणखाना किंवा इतर खोल्या सजवण्यासाठी वापरू शकतो. तेव्हा आपल्याकडील ग्रील, गच्ची किंवा आजुबाजूच्या जमिनीवर, ऊन म्हणजे डायरेक्ट सूर्यप्रकाश येतो की नाही, येत असेल तर ऊन किती वेळ असतं याची माहिती असणे आवश्यक आहे. आपली गच्ची, ग्रील किंवा आजुबाजूची जमीन कोणत्या दिशेला आहे, त्यानुसार सूर्याचे उत्तरायणात ऊन येते पण दक्षिणायनात येत नाही असे होऊ शकते. हा अभ्यास झाल्यानंतर कोणत्या झाडांना आपलं घर मानवणार आहे हे आपण ठरवू शकतो आणि त्यानुसार योग्य झाडांची निवड करू शकतो. थोडक्यात, आपल्या आवडीपेक्षा झाडाला काय आवडतं हे गृहवाटिकेसाठी महत्त्वाचं!!