अग्निशमन दलाच्या जवानासह तीन जण जखमी

नालासोपारा येथील एका इमारतीत मंगळवारी पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत दोन सिलिंडरचा स्फोट होऊन आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग विझवताना वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचा एक जवान तसेच आग बघण्यासाठी आलेल्या दोन नागरिकांसह तीन जण जखमी झाले आहे. विशेष म्हणजे याच इमारतीत अवघ्या सहा दिवसांपूर्वीदेखील आग लागली होती.

नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्कमधील अस्टर अपार्टमेंटच्या बी विंगमधील २०३ क्रमांकाच्या घरात दिनेश कुमार बरनवाल यांचे कुटुंबीय राहतात. मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास त्यांच्या घराला आग लागली. त्या वेळी सगळे झोपेत होते. आगीचा धूर आल्यामुळे आरडाओरड झाली आणि बरनवाल कुटुंबीय घरातून बाहेर पडून रस्त्यावर आले. आगीचे लोळ आणि धुराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढू लागल्याने संपूर्ण इमारत खाली करण्यात आली. त्याच वेळी दिनेश कुमार यांच्या घरातील मोकळ्या जागेत ठेवलेल्या सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतीमधील लोकांनी पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती. तितक्यात दुसऱ्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने याच इमारतीच्या ‘सी’ विंगमधील मारुती शिंदे यांच्या रूम नंबर २०१ मध्येही आगीने पेट घेतला. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाडय़ा घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे भीषण आग विझली. आग विझवताना अग्निशमन दलाचा जवान विक्रांत पाटील हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी साने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही घरांची वित्तहानी मोठय़ा प्रमाणात झाली आहे. अवघ्या सहा दिवसांपूर्वी याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील बिग बॉस या डान्स अकादमीला भीषण आग लागली होती. त्यामुळे या आगीबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

आग बघायला जाणे महागात पडले

आग लागल्यावर बघण्यासाठी गेलेले दोन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. राज कातवाल हे ते दररोज सकाळी या परिसरातील ‘वृंदावन’ उद्यानात प्रभातफेरीसाठी जायचे. आग लागल्याचे कळल्यावर ‘अस्टर अपार्टमेंट’मध्ये पोहचले. त्याच वेळी सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला आणि काचेचा एक तुकडा राजू यांच्या डोक्याला लागल्याने ते जखमी झाले. आगीची झळही बसल्याने काही ठिकाणी भाजले आहे. त्यांच्याप्रमाणेच मनोज सिंग हा तरुणदेखील आग बघण्यासाठी गेला होता. तो देखील आगीत जखमी झाला आहे. या दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘अस्टर’ अपार्टमेंटमध्ये सिलेंडरचे स्फोट आणि आग लागली असल्याची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहचलो. या आगीत तीन जण जखमी झाले आहेत.

–  प्रताप दराडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक, नालासोपारा

>