अंबरनाथ पालिकेने घंटा गाडीचे कंत्राट दिलेल्या ठेकेदाराने ठेका संपला म्हणून त्याचे काम एक दिवसापूर्वी थांबवून पालिकेला हादरवून सोडले होते. परंतु, एकाच दिवसांत या ठेकेदाराला उपरती सुचली आणि त्याने कचरा उचलण्याचे काम पुन्हा सुरू केल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याकडून समजत असून त्यामुळे अंबरनाथमध्ये घंटागाडीची घंटा सध्या तरी रोज वाजणार आहे.
अंबरनाथ पालिका क्षेत्रात सध्या दररोज १०५ टन कचरा तयार होत आहे. हे कचरा उचलण्याचे कंत्राट संपल्याचे कारण देत हा कचरा उचलणाऱ्या व्ही. एस. पनवेलकर या ठेकेदाराने हे काम थांबवले होते. त्यामुळे पालिकेची व येथील अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली होती. पाच वर्षांसाठी याला ठेका देण्यात आला होता.
निविदेप्रमाणे प्रत्येक दिवसाचा दर ४६ हजार निश्चित करण्यात आला होता. या दराला मंजुरी देत असताना ठेकेदाराने पाच वर्षांसाठी सलग काम केल्यास संबंधित ठेकेदाराला ५५ हजार रूपये एवढा वाढीव दर मंजूर केला होता. परंतु, हा पाच वर्षांचा करार ३१ मे रोजी संपला होता. परंतु, निविदेत उल्लेख असल्याप्रमाणे नविन निविदा काढेपर्यंत जुन्याच ठेकेदाराला मंजूर दराने काम करणे बंधनकारक होते. मात्र या अटीला न जुमानता ठेकेदाराने घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याचे काम १ जुलैपासून बंद केले. यामुळे शहरांत मोठा गहजब निर्माण झाला होता, कारण दररोज निर्माण होणारा १०५ टन कचरा उचलण्याची यंत्रणा पालिकेकडे नव्हती. त्यामुळे कचऱ्यामुळे रोगराई पसरण्याची भिती व्यक्त होत होती. कचरा वेळप्रसंगी पालिकेचे सफाई कर्मचारी उचलतील पण रोगराई होऊ देणार नाही.  असे यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांनी सांगितले होते. परंतु, अचानक ठेकेदाराला उपरती झाली का काही वेगळे घडले हे अजून प्रकाशझोतात आले नसले तरी, ठेकेदार कचरा उचलण्यास तयार झाला असून अंबरनाथकरांवर येणारे कचरा संकट सध्या तरी टळले आहे. पालिकेनेच ठेकेदाराच्या मुजोरीला वेसण घातल्याची चर्चा मात्र दिवसभर पालिका वर्तुळात चालू होती.
दरम्यान, ठेकेदाराने कचरा उचलण्याचे काम एक दिवस थांबवले होते. परंतु, दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी कचरा उचलण्यास सुरूवात केली आहे व दुसरी निविदा निघेपर्यंत कचरा पूर्वीचा ठेकेदार उचलणार आहे. असे पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी सुरेश पाटील यांनी सांगितले.