अंतर्गत रस्त्यांवरून येणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र, लवकरच या कोंडीतून वाहनचालकांची सुटका होण्याची शक्यता आहे. घोडबंदर रस्त्याला समांतर असा सेवा रस्ता उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून या सेवा रस्त्याच्या आखणीत अडसर बनलेल्या बांधकामांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सेवा रस्ता बनल्यास घोडबंदर मार्गावरून होणाऱ्या अंतर्गत वाहतुकीला वेगळी वाट मिळणार आहे.
ठाणे शहराला अहमदाबाद महामार्गाशी जोडणाऱ्या घोडबंदर मार्गावर वाहनांची रहदारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच घोडबंदर परिसरात उभ्या राहिलेल्या मोठमोठय़ा गृहसंकुलांमुळे या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. ही वाहने महामार्गाला जोडून असलेल्या अंतर्गत रस्त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर करतात. मात्र, यामुळे घोडबंदर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. अंतर्गत वाहतुकीच्या भारामुळे होणारी ही कोंडी सोडवण्यासाठी या महामार्गाला समांतर सेवा रस्ता उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. काही पट्टय़ात सेवा रस्ता उभारण्यातही आला. मात्र, या मार्गात अनेक बांधकामे असल्याने हा रस्ता पूर्ण होऊ शकला नाही.
 या पाश्र्वभूमीवर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी घोडबंदर भागाचा पहाणी दौरा केला. या वेळी घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ता पूर्ण करण्याच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या बांधकामांचे पुनर्सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन करावे, असे आदेश त्यांनी शहर विकास विभागाला दिले.
त्याचप्रमाणे सेवा रस्त्यावरील ग्रीन झोन, वन जागा, खासगी जागा, सीआरझेडची जागा असेल तर त्याबाबत शहर विकास विभागाने त्वरित सल्लागार नेमून शासनाकडे पाठपुरावा करून संबंधित जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी दिले. तसेच बाधित बांधकामे तोडून सेवा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या आदेशाची अंमलबजावणी होऊन सेवा रस्ता पूर्ण झाल्यास घोडबंदर मार्गावरून होणाऱ्या अंतर्गत वाहतुकीला पर्यायी रस्ता मिळू शकेल, अशी शक्यता आहे.