नियंत्रण सुटलेल्या भरधाव बसने चार वर्षांच्या बालिकेला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सकाळी दहाच्या सुमारास भाईंदर पश्चिमेकडील राधास्वामी सत्संग रस्त्यानजीक ही घटना घडली.

उत्तनच्या दिशेने ही बस निघाली होती. या वेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर आदळून पलीकडील एका झोपडीत शिरली. या वेळी त्या ठिकाणी तीन लहान मुली खेळत होत्या. यातील अक्षिता राजेंद्र सिंह हिला बसची जोरदार धडक बसली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. बसचालक धनुजित विश्वास व साहाय्यक सुजित विश्वास या दोघांनाही जमावाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. धनुजित हा सुजित या साहाय्यकाला बस चालविण्याचे प्रशिक्षण देत असतानाच त्याचे नियंत्रण सुटले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.