लोकल रेल्वे प्रवाशांची मागणी

लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून ठाणे, कल्याण, डोंबिवली, कसारा, कर्जत परिसरातील प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा रेल्वे प्रशासनाने दिली तर लोकल वाहतुकीवर येणारा प्रवाशांचा बोजा कित्येक पटीने कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवाशांना प्रवासाची मुभा द्यावी, अशी जोरदार मागणी ठाणे ते कर्जत, कसारादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

या प्रवासासाठी रेल्वेने पासधारकांकडून सुमारे ४० ते ५० रुपये वाढीव दर आकारला तरी प्रवासी हा दर देण्यास सहज तयार होतील, असे प्रवाशांनी सांगितले. मुंबई सीएसटीहून ठाणे, डोंबिवली, कल्याण ते कर्जत, कसारादरम्यान प्रवास करणारा प्रवासी नेहमीच जलद लोकलने आपल्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक प्रवासी अलीकडे कमी वेळात आपल्या ठिकाणी पोहोचण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे जलदगती गाडय़ांमधील प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे, असे प्रवाशांकडून सांगण्यात येते.

सीएसटीकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या जलदगती गाडय़ा ठाणे, कल्याण आणि कर्जत, कसारा भागात थांबविण्यात आल्या तरी त्यांच्या लगतच्या रेल्वे स्थानकांचा प्रवासी या स्थानकांवर उतरून धिम्या लोकलने आपल्या मूळ ठिकाणी जाईल. सीएसटीहून आलेला डोंबिवलीचा प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत येऊन, कल्याणला उतरून तो धिम्या लोकलने पुन्हा डोंबिवलीपर्यंत जाऊ शकतो, असे प्रवाशांनी सांगितले.

कल्याण रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. बहुतांशी प्रवासी हे कल्याणसह मुरबाड, भिवंडी या ग्रामीण भागातून येतात. या प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवासाची मुभा दिली तर लोकल प्रवासावरील भार कमी होईल. कर्जत, कसारा, खोपोलीकडे जाणाऱ्या किंवा या ठिकाणाहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल जलद असल्याने प्रवासी या लोकलना अधिक प्राधान्य देतात. या लोकलमधून मधल्या रेल्वे स्थानकांमधील प्रवासी अधिक संख्येने चढतात. त्यामुळे शेवटच्या स्थानकापर्यंत (कसारा, कर्जत) जाणारा प्रवासी अनेक वेळा अति गर्दीमुळे फलाटावरच राहतो, असे प्रवाशांनी सांगितले.

मुंबईहून येताना आणि जाताना अनेक प्रवासी आजही लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून चोरून लपून प्रवास करीत असतात. हा प्रवास सुटसुटीत केला तर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये गर्दीचे विभाजन होऊन रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला आहे.

नव्या नियमामुळे बंद

लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून यापूर्वी कल्याण रेल्वे स्थानकातून प्रवासी प्रवास करीत असत. मधल्या काळात रेल्वेकडून नवीन नियम आले. आता प्रवासी संख्या वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवाशांना थोडा वाढीव दर आकारून प्रवास करू देण्यास काहीच हरकत नाही, अशी प्रतिक्रिया कल्याणमधील ज्येष्ठ नागरिक डॉ. श्रीनिवास साठे यांनी दिली आहे.