अर्निबध रेती उपशाने ठाणे खाडीचे चहूबाजूने लचके तोडणाऱ्या वाळू माफियांवर जिल्हा प्रशासनाने मंगळवार रात्रीपासून केलेल्या जोरदार कारवाईत एक कोटींहून अधिक किमतीचा वाळूसाठा तसेच दहा कोटी रुपयांहून अधिक किमतीची यंत्रसामग्री आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या मदतीने केलेल्या या धडक कारवाईमुळे अनधिकृतरीत्या रेती उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे, कल्याण तसेच भिवंडी खाडी परिसरात एकाच वेळी करण्यात आलेल्या या कारवाईत वाळू उपसा करणारी फार मोठी यंत्रणा प्रशासनाच्या हाती लागली असली तरी वाळू माफिया मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ तसेच डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतर ठिकाणीही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मंगळवारी संध्याकाळी साडेसात आठ वाजल्यापासून कारवाईस सुरुवात झाली. ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही विभागातील मुंब्रा पारसिक रेतीबंदर, गांधी रेतीबंदर, नागला बंदर, कल्याण रेतीबंदर, मोठा गाव ठाकुर्ली रेतीबंदर, मौजे देहले, अंजुरफाटा ते चिंचोटी पुलाची दक्षिण व उत्तर बाजू या ठिकाणच्या खाडीकिनारी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या ताब्यातील गस्ती नौकांचाही यात वापर करण्यात आला.
या कारवाईत ४२ क्रेन्स, १०२ लाकडी बोटी, पाच ट्रक, बार्ज, ड्रेझर्स जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे दोन सेक्शन पंप खाडीत बुडविण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या या यंत्रसामग्रीची तसेच वाहनांची अंदाजे किंमत दहा कोटी रुपयांहून अधिक आहे. तसेच विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत ३ हजार २२१ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. याची किमान बाजारभावानुसार १ कोटी, १३ लाख ४२ हजार ५०० रुपये इतकी किंमत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अप्पर जिल्हाधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांसह मोठय़ा प्रमाणात महसूल कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला. रात्री साडेआठ ते सकाळी साडेपाचपर्यंत ही कारवाई सुरू होती. पुन्हा सकाळी भिवंडी खाडी परिसरात कारवाई करून उरल्यासुरल्या रेती माफियांना ठाणे खाडी परिसरातून हुसकावून लावण्यात आले.

‘लोकसत्ता’चा पाठपुरावा
‘लोकसत्ता’ने अर्निबध रेती उपशामुळे खाडी पात्रात होणारी अक्षम्य ढवळाढवळ आणि त्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय ऱ्हासाचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. खाडीतून रेती उकरून काढण्याच्या नादात मध्य रेल्वे मार्गासही धोका उत्पन्न झाल्याची वस्तुस्थिती ‘लोकसत्ता’नेच उजेडात आणली होती.
कल्याणमध्ये बेकायदा केरोसिनही जप्त
कल्याण रेतीबंदर येथे केलेल्या कारवाईत बेकायदेशीररीत्या साठा केलेले तब्बल साडेतीन हजार लिटर केरोसिनही जप्त करण्यात आले.