महिलांवर होणाऱ्या अन्यायासाठी राज्य सरकार किंवा पोलीस खाते जबाबदार नसून ते त्यांची जबाबदारी योग्य रितीने पार पाडत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितले. त्या शुक्रवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्यातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जिल्हा आणि तालुका स्तरावर महिलांना एकत्र आणण्याची योजना आखत असल्याचे सांगितले. यावर राज्य सरकार यामध्ये कमी पडत असल्याने तुम्हाला ही योजना हाती घ्यावी लागत आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अमृता फडणवीस यांनी म्हटले की, राज्य सरकार आणि पोलीस कुठेही कमी पडत नाहीत. ते आपले काम योग्य रितीने करत आहेत. मात्र, काही प्रकरणांमध्ये महिलांचे समुपदेशन करण्याची गरज असते. जेणेकरून महिलांनी त्यांच्यावरील अन्यायाविरोधात पुढे यावे. अन्यथा अनेक घटना दबून जातात. त्यामुळेच आम्ही तालुका आणि जिल्हा पातळीवर महिलांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहोत. जेणेकरून एखाद्या महिलेवरील अन्यायाविरोधात एकत्र येऊन तिला प्राधान्याने न्याय मिळवून देण्यासाठी मदत करता येईल, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.