tvlog06सध्याच्या काळात मोबाइल आणि कॉम्प्युटर यांसारखी उपकरणे वापरता येणं अत्यंत गरजेचं झालं आहे. तरीही बरीचशी ज्येष्ठ मंडळी तंत्रज्ञानाच्या या आविष्कारापासून दूरच राहताना दिसतात. त्यांच्याकडील मोबाइलही फक्त संभाषणापुरताच कामी येतो. असं असलं तरी ‘रेकॉर्ड संग्राहक’ कृष्णराव टेंबे यांना भेटल्यावर आपला हा समज नाहीसा होतो. ८७ वर्षांचे टेंबे आजोबा अत्यंत टेक्नोसॅव्ही आहेत. त्यांच्याकडील सर्व रेकॉर्ड्स त्यांनी स्वत: डिजिटलाइझ केल्या आहेत. ग्रामोफोन, रेकॉर्ड्स आणि जुनी गाण्यांचे चाहते असतानाही नव्या काळातील नव्या तंत्राशीही त्यांनी मैत्री केली आहे.
टेंबे आजोबा एसटीमध्ये कामाला होते. नोकरी बदलीची असल्याने कुटुंबाचा मुक्कामही हलता असायचा. नागपूरला असताना त्यांनी ‘रेकॉर्ड्’सचा संग्रह करण्यास सुरुवात केली. तिथे ते दर महिन्याला एक रेकॉर्ड विकत घ्यायचेच. ती कोणती रेकॉर्ड घ्यायची हे आधीपासूनच ठरवून ठेवलेलं असायचं. तेथील ‘रमेश ग्रामोफोन कंपनी’चे दुकानदारही नवीन रेकॉर्ड आली की टेंबे यांना कळवायचे. असं करत करत टेंबे आजोबांनी बराच मोठा संग्रह जमवला आहे.
टेंबे आजोबांकडे प्रामुख्याने बाबूजी अर्थात सुधीर फडके, पं. रविशंकर आणि कुमार गंधर्वाचं कलेक्शन आहे. विद्यापीठात असताना बाबूजींनी गायलेलं ‘तयांची मनीषा कोण पुरी करणार’ हे गाणं टेंबे आजोबांच्या मनात घर करून राहिलं. मग कालांतराने खास बाबूजींचं गाणं ऐकण्यासाठी त्यांनी रेकॉर्ड प्लेयर घेतला! रेडिओवर बाबूजींचं गाणं लागलं, की घरात कर्फ्यू असायचा! कुणीच न बोलता शांतपणे ते गाणं ऐकलं जायचं. ‘गीतरामायणा’पासून त्यांनी बाबूजींच्या कलेक्शनला सुरुवात केली आणि आता आजोबांकडे बाबूजींशी संबंधित असलेली सगळी गाणी आहेत. रेडिओवर प्रसारित झालेलं मूळ ‘गीतरामायण’ आहे. ललिता फडके यांची गाणी आहेत. ललिताबाईंनी डावजेकरांकडे गायलेली गाणीसुद्धा आहेत. बाबूजी नेहमी गायकाच्या वैशिष्टय़ांना अनुसरून चाल तयार करायचे. बालगंधर्व नेहमी ‘आ’कारात ताना घेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ‘शरण शरण नारायण’ची चाल बांधताना ‘शरण शरण नारायण’नंतर किंचित पॉज घेऊन आकारातली तान आहे, हे टेंबे आजोबांनी सांगितलं. ‘पाच प्राणांचा रे पावा’, ‘स्वर्ग मेल्याविना दावी’, ‘अंतरीच्या गूढगर्भी’ अशी बाबूजींची काही वैशिष्टय़पूर्ण गाणीही आजोबांनी आवर्जून ऐकवली. बाबूजींच्या आवाजातली पारंपरिक पाळण्याची चाल असणारी ‘सागरा प्राण तळमळला’ ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची रचना ऐकताना तर डोळ्यांत पाणी आलं! बाबूजींची हजारेक तरी गाणी टेंबे आजोबांकडे असतील. शिवाय बाबूजींचे टी.व्ही.वर झालेले कार्यक्रमही त्यांच्या कलेक्शनमध्ये आहेत. त्यांच्या परदेशात झालेल्या कार्यक्रमाचं रेकॉìडग स्वत: श्रीधरजींनी त्यांना दिलंय. ‘एक धागा सुखाचा’ हा बाबूजींच्या गाण्यांचा कोश टेंबे आजोबांनी, सहसंपादक वसंत वाळुंजकर यांच्यासोबत संपादित केलाय. हा कोश म्हणजे खरंच खूप मोठं डॉक्युमेंटेशन आहे. टेंबे आजोबांकडे भीमसेनजींचं जवळजवळ सगळं कलेक्शन आहे. वसंतराव देशपांडेंचं कलेक्शन आहे. कुमारजी, किशोरी आमोणकर, पं. राजन-साजन मिश्रा यांच्यावरच्या ऑडिओ-व्हिज्युअल डॉक्युमेंटरीजपण आहेत. सवाई गंधर्व महोत्सवाचं १९८० सालापासूनचं उत्तम रेकॉìडग आहे. सगळं मिळून साधारण दोन हजार तासांचं रेकॉìडग त्यांच्याकडे असेल! सगळ्या रेकॉर्ड्सचं डिजिटलायझेशन करून रेकॉर्डस त्यांनी सुरेश चांदवणकरांकडे दिल्या आहेत.
कुमार गंधर्व गेल्यानंतर एचएमव्हीने टेंबे आजोबांकडून कुमारजींची गाणी घेऊन एक श्रद्धांजलीपर रेकॉर्ड काढली. आजोबांनी रेकॉर्ड्सवरची माहिती संकलित करून एक कंपायलेशन केलं होतं. तेच त्या रेकॉर्डच्या मागे छापण्यासाठी एचएमव्हीने वापरलं होतं. ही सगळी गाणी लोकांपर्यंत पोहोचावीत म्हणून टेंबे कुटुंबीय गाण्यांचे कार्यक्रमही करतात. बाबूजींच्या िहदी गाण्यांचा कार्यक्रम, कुमारजींच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम, सूरदास, तुलसीदास दर्शन, तुकाराम दर्शन, पं. रविशंकर यांचं शास्त्रीय, चित्रपट संगीत, वसंतराव देशपांडे, ललिताबाई फडके यांच्या गाण्यांचे कार्यक्रम, व्होकल-इन्स्ट्रमेंटल जुगलबंदी असे बरेच कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत केले आहेत. हे कार्यक्रम करताना त्याची तयारी, आखणी वगरे अगदी चोख असते. टेंबे आजोबांचे चिरंजीव- अरुण टेंबे गाण्यांची निवड करतात, सूनबाई- संध्या टेंबे निवेदन करतात, तर सगळी तांत्रिक बाजू टेंबे आजोबा सांभाळतात! या वयातही नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड असणाऱ्या टेंबे आजोबांनी आणि त्यांच्या छंदात सक्रिय सहभागी होणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांनी मला खरंच भारावून टाकलं होतं! अनेक वर्षांपासून मी भीमसेनजींनी गायलेलं ‘सखी मंद झाल्या तारका’ हे गाणं शोधत होते. ते टेंबे आजोबांच्या कलेक्शनमध्ये सापडलं आणि ते ऐकूनच मी टेंबे कुटुंबीयांचा निरोप घेतला.  
अंजली कुलकर्णी-शेवडे