देखभालीअभावी हिरवळ गायब, झाडे बोडकी
ठाणे शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेने मोठा गाजावाजा करीत तीन हात नाका ते नितीन कंपनीपर्यंत तयार केलेल्या हरित जनपथावरील हिरव्यागार गवतांची जागा आता सुकलेल्या गवतांनी घेतली आहे. या ठिकाणी असलेल्या काही शोभेच्या वृक्षांच्या फांद्या गळून पडल्यामुळे ही झाडे मरणावस्थेत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. शहरात झाडांची नव्याने लागवड करून ठाण्याला हिरवेगार करण्याची भाषा एकीकडे केली जात असताना दुसरीकडे हरित पथाला वाळवंटाची दशा आली आहे.
ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या संकल्पनेनुसार मुंबई-नाशिक महामार्ग आणि सेवा रस्त्यांच्या मधोमध हरित जनपथाची निर्मिती करण्यात आली. दोन्ही बाजूला हिरवळ आणि मधोमध पदपथ अशा स्वरूपाची रचना या ठिकाणी करण्यात आली. या जनपथावर मोठय़ा संख्येने झाडेही लावण्यात आली. अशा निसर्गरम्य वातावरणामुळे या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली. येथे खुली व्यायामशाळाही उभारण्यात आल्यानंतर सकाळी-संध्याकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक खास व्यायाम करण्यासाठी हरित जनपथाकडे येऊ लागले.
असे असतानाच महिनाभरापूर्वी महापालिका प्रशासनाने तीन हात नाका भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हरित जनपथावर घाला घातला होता. महामार्ग आणि सेवा रस्ता जोडण्यासाठी हरित जनपथ दोन ठिकाणी खोदण्यात आला होता. मात्र, नागरिकांकडून नाराजी व्यक्त होऊ लागताच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हे काम थांबविण्याचे आदेश दिले. तसेच हरित जनपथ पूर्ववत करण्याचेही आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे खोदण्यात आलेल्या जागेवर पुन्हा मातीचा भराव टाकण्यात आला आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हरित जनपथाच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले असून त्यामुळे येथील हिरवेगार गवत पूर्णपणे सुकले आहे. काही ठिकाणी शोभेचे वृक्ष मरणावस्थेत टेकलेले आहेत. त्यामुळे हरित जनपथाची पुरतीच रया गेल्याचे चित्र आहे. जनपथावरील देखभाल आणि दुरुस्तीकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष होत असल्यामुळे हरित जनपथाचे वाळवंट झाल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे.

प्रक्रियाकृत पाण्याचा वापर नाही
कोपरी येथे पालिकेचे मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी सार्वजनिक तसेच खासगी उद्यानांना पुरविण्याची पालिकेची योजना आहे. असे असताना या केंद्रातील प्रक्रियायुक्त पाणी हरित पथासाठी का वापरात आणले जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.