नववर्ष स्वागतयात्रेतून शहर विकासाचा जागर; चित्ररथ, देखाव्यांद्वारे जनजागृतीचाही प्रयत्न

स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त डोंबिवली, रोकडविरहित व्यवहार, प्लॅस्टिकमुक्ती, महिलांची सुरक्षितता, शिक्षणाचा प्रसार असे विविध उपाय सुचवणारे चित्ररथ, देखावे, वेशभूषा करत समस्त डोंबिवलीकरांनी मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘स्मार्ट डोंबिवली’ची कुंडली मांडली. शहरातील ६८ संस्थांनी साकारलेले ५५ चित्ररथ, पारंपरिक वेशभूषेत रस्त्यावर उतरलेले नागरिक, दुचाकीस्वार महिला आणि ढोलताशांचा गजर या साऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवलीची नववर्ष स्वागतयात्रा वैशिष्टय़पूर्ण झाली होती.

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]

श्रीगणेश मंदिर संस्थानच्या वतीने नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन शहरात करण्यात आले होते. सकाळी ६.३० वाजता संघप्रचारक मनमोहन वैद्य यांच्या हस्ते गणेशपूजन व पालखीपूजन करण्यात आले. त्यानंतर पालखीचे भागशाळा मैदान येथे प्रस्थान झाले. यावेळी या पालखीसोबत मुस्लीम समाजातील नागरिकही मोठय़ा उत्साहात सहभागी झाले. स्वागतयात्रेचे स्वागत करण्यासाठी पूर्ण मार्गावर रांगोळीच्या पायघडय़ा घालण्यात येत होत्या.

भागशाळा मैदानाजवळ पालखीचे ढोलताशांच्या गजरात व गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात स्वागत करण्यात आले. सकाळी ७.३० वाजता स्वागतयात्रेची सुरुवात डोंबिवली सायकल क्लबपासून झाली. प्रदूषण कमी करण्यासाठी एक दिवस तरी सायकल चालवा, असा संदेश या क्लबच्या सायकलस्वारांनी दिला. त्यांच्यापाठोपाठ बुलेट बाईकस्वार सामील झाले होते. महिलाही नऊवारी साडी त्यावर फेटा बांधून बुलेट व बाईकवर स्वार झाल्या होत्या. श्रीगणेश मंदिर संस्थानच्या वतीने ‘बेटी बचाव’ या पथनाटय़ाचे सादरीकरणही यात्रेदरम्यान करण्यात आले.  गणेश मंदिर संस्थानचा चित्ररथही यात्रेच्या आकर्षणाचा विषय ठरला. संस्थानने डोंबिवलीची कुंडलीच चित्ररथाच्या माध्यमातून साकारली होती. कुंडलीद्वारे डोंबिवलीचे ग्रहमान हे ‘स्मार्ट सिटी’ होण्याकडे कसे वळतील हे दाखविण्यात आले होते. शिक्षणाचा समजलेला अर्थ, माझा कौटुंबिक संवाद, मी व महिलांचा सन्मान, स्वच्छ प्रदूषणमुक्त डोंबिवली, युवक-युवतींना अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य, महिलांची सुरक्षितता, रोकडविरहित अर्थव्यवहार, सोशल मीडिया व सायबर क्राईम, प्लॅस्टिकमुक्त शहर आदी बदल घडले तर डोंबिवली स्मार्ट होऊ शकेल, असा संदेश यात्रेतून देण्यात आला.

आदिवासी बांधवांचा सहभाग

हेल्पिंग हॅण्ड वेल्फेअर्स सोसायटी या संस्थेने वारली कलेचे दर्शन घडविणारा चित्ररथ सजविला होता. या चित्ररथासमोर आदिवासी बांधवांनी तारपा नृत्य सादर केले. आटगांव येथील गरेलपाडा, आसनगांव, शहापूर, पालघर आदी परिसरातून आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी झाले होते. वनवासी कल्याण आश्रमातील मुलेही या यात्रेत सहभागी झाली होती.

उन्हामुळे उत्साह ओसरला

उन्हाच्या वाढत्या पाऱ्याचा फटका यंदाच्या स्वागतयात्रेला बसला. सकाळी नऊपासूनच उन्हाचा तडाका जाणवायला सुरुवात होत असल्याने अनेक नागरिकांनी स्वागतयात्रेतून काढता पाय घेण्यास सुरुवात  केली. त्यामुळे समारोपाच्या ठिकाणी तुलनेने कमी गर्दी होती. उन्हाचा फटका नागरिकांना बसू नये म्हणून विविध संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी पाणी, ताक, थंड दूध यांचे वाटप करण्यात येत होते.

तरीही ‘कचरा’ दर्शन

स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या श्रीगणेश मंदिर संस्थानने स्वागतयात्रेच्या माध्यमातून ‘स्वच्छ सुंदर डोंबिवली’चे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला. मात्र मंदिराच्या बाजूलाच असलेल्या शिवाजी बालोद्यान येथे सकाळी मोठय़ा प्रमाणात कचरा जमा झालेला होता. यात्रेत सहभागी नागरिकही स्वतजवळील कचरा या ढिगाऱ्यात टाकताना दिसून आले.

राजकारणीही मिरवणुकीत

स्वागतयात्रेचे स्वागत करण्यासाठी पक्षांमध्ये चढाओढच लागलेली दिसून आली. चार रस्ता येथे शिवसेना, भाजप, मनसेच्या वतीने हाकेच्या अंतरावर मंडप उभारण्यात आले होते.

बदलापूरच्या स्वागतयात्रेत स्त्री-शक्तीचे दर्शन

बदलापूर : पारंपरिक वेषभूषेतील अश्वारूढ महिला, दुचाकीवर असलेल्या महिला, त्यामागे पारंपरिक वेशात सामाजिक संदेश देणाऱ्या महिलांचा गट, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत ढोल-ताशांचा नाद घुमवणाऱ्या रणरागिनी अशा अनेक रूपांमधून बदलापूरच्या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये स्त्री-शक्तीचा जागर पाहायला मिळाला. बदलापुरातील नववर्ष स्वागत यांत्रेमध्ये महिलांच्या मोठय़ा सहभागाने स्वागतयात्रेला एक वेगळेच रूप प्राप्त झाले होते.

बदलापुरातील नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि हनुमान मारुती देवस्थान आयोजित नववर्ष स्वागत यात्रेला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास पश्चिमेतील दत्त चौक परिसरातून सुरू झालेली नववर्ष स्वागतयात्रा अनेक थांबे घेत गणेश चौक, मोहनानंद नगर, सवरेदयनगर, रेल्वे स्थानकमार्गे उड्डाणपुलावरून गांधी चौकात पोहोचली. यंदाच्या स्वागतयात्रेत महिलांच्या विविध पथसंचलनाने शोभायात्रेची शोभा वाढवली. शोभायात्रेच्या सुरुवातीलाच घोडय़ावर बसलेल्या पारंपरिक वेशातील फेटेधारी महिला स्वागतयात्रेचे संचलन करत होत्या. त्यानंतर दुचाकीवरील महिला, पायी पालखी आणि त्यानंतर गर्जा ढोल-पथक अशा जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागतयात्रेने उड्डाणपूल पार करत पूर्वेत प्रवेश केला.

अंबरनाथमध्येही जल्लोषात नववर्षांचे स्वागत

अंबरनाथ : दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथमध्ये गुढीपाडव्याला निघालेल्या स्वागतयात्रेच्या उत्साहाला उधाण आले होते. शेकडो अंबरनाथकर स्त्री-पुरुष पारंपरिक वेषात यात्रेत सहभागी झाले होते. आकर्षक चित्ररथ, मोठय़ा संख्येने निघालेली महिलांची बाईक रॅली आणि ढोल-ताशांच्या गजरात नववर्षांचे स्वागत करण्यात आले.

अंबरनाथमधील नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने यंदाही गुढीपाडव्यानिमित्ताने स्वागतयात्रा आयोजित करण्यात आली होती. यंदा वडवली येथील ब्राह्मण सभेला यात्रेचे यजमानपद देण्यात आले होते. सकाळी आठच्या वाजता खेर विभागातील हेरंब मंदिरपासून स्वागतयात्रेला सुरुवात झाली, विविध धार्मिक तसेच शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचे चित्ररथ या वेळी सहभागी झाले होते. पाणी वाचवा, बेटी बचाओ, निसर्गाचे संतुलन राखा, मल्लखांब, स्त्रीभ्रूण हत्या रोखा यांसारखे सामाजिक विषय हाताळण्यात आले होते. उंट,  घोडे, बैलगाडय़ांचाही समावेश या स्वागतयात्रेत होता. दुष्काळग्रस्त शेतकरी, कष्टकरी यशस्वी व सुदृढ शेतकरी, स्त्रीभ्रूण हत्या, सर्वधर्मसमभाव, पर्यावरणरक्षण, प्रदूषण नियंत्रण, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनचरित्र अशा अनेक विषयांवरील चित्ररथांचा यात सहभाग होता. गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनीही सायकल रॅली काढून पर्यावरणरक्षणाचा संदेश दिला.

कल्याणात पालिकेच्या भ्रष्टाचारावर आसूड

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे दर्शवणाऱ्या रांगोळय़ा शहरातील नववर्ष स्वागतयात्रेचे वैशिष्टय़ ठरल्या. चैत्रपाडव्यानिमित्त कल्याण शहर पूर्व आणि पश्चिम भागात काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागतयात्रेत शहरवासीय उत्साहाने सहभागी झाले होते. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी या वेळी प्रथमच ढोलताशांचा स्वागतयात्रेतील गजर कमी करण्यात आला होता. कल्याण संस्कृती मंच आणि याज्ञवल्क्य संस्था यांच्या पुढाकाराने व शहरातील इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आली. याज्ञवल्क्य संस्थेकडे या वेळी स्वागतयात्रेचे यजमानपद होते. स्वागतयात्रेत ६५ चित्ररथ होते. भारतीय लष्कराने पाकिस्तान हद्दीत घुसून केलेली लक्ष्यभेदी कारवाईचे चित्ररथावरील देखावे लक्ष वेधक होते. नोटाबंदीचे चित्ररथ या वेळी सजविण्यात आले होते. पाणी बचत, पर्यावरण संवर्धन असे निसर्ग संवर्धनाबरोबर सामाजिक संदेश चित्ररथांच्या माध्यमातून देण्यात आले होते. रस्त्यावरील रांगोळ्यांमधून पालिकेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधण्यात आले होते. हा भ्रष्टाचाराचा विषय सार्वजनिक चर्चेचा विषय झाला होता. सिंडिकेट येथून स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड हे मान्यवर स्वागतयात्रेत सहभागी झाले होते.

[jwplayer pqdTtL1f-1o30kmL6]