गुरुपौर्णिमा काल सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. आपल्या गुरूंच्या प्रती असलेला आदर, भावना चिमुकल्यांनीसुद्धा गुलाबाचे फूल देवून आपल्या शिक्षकांसमवेत व्यक्त केल्याचे चित्र पाहायला मिळाले. आई हा आपला पहिला गुरू, त्यानंतर आपले शिक्षक, मागदर्शन करणाऱ्या व्यक्तींना प्रत्येकजण गुरूस्थानी मानत असतो. निवृत्तीनंतरही विशेष मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या शामश्री भोसले यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी विसरता येऊच शकत नसल्याचे जिद्द या शाळेतून प्रशिक्षण घेऊन आपल्या स्वत:च्या पायावर उभे राहिलेले विद्यार्थी सांगतात. शामश्री भोसले एक असं व्यक्तिमत्त्व की ज्यांनी निवृत्तीनंतरही आपले विशेष मुलांना प्रशिक्षण देण्याचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेतून निवृत्त झालेल्या या शिक्षिका. गतिमंद मुलांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यात स्वत:ची जाणीव निर्माण करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ देतात. जिद्द शाळेतील मुलांमधील जिद्द याचि देही याची डोळा पाहणाऱ्या शामश्री भोसले त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात. त्यांच्याशी संवाद साधला असता, निवृत्तीनंतरही त्या अपंग मुलांच्या क्षेत्रात मनापासून कार्य करत आहेत, किंबहुना आपले आवडीच्या क्षेत्रात कार्य करायला मिळाले याचा आनंद त्यांच्या बोलण्यातून जाणवतो. जिद्द शाळेनंतर सध्या त्या जागृती पालक संस्थेसोबत कार्य करीत आहेत. सुनंदाताई पटवर्धन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले कार्य करणाऱ्या शामश्री भोसले यांचा गुरुपौर्णिमेचा दिवसच जणू शुभेच्छाने सुरू झाल्याचे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा ओसंडून वाहत होता. विकलांग मुले ही शरीराने अधू असतात, पण त्यांचे मन मात्र खंबीर असते, या खंबीर मनाला उभारी देण्याचा प्रयत्न मी केला, शेवटी सगळे प्रयत्न आणि करण्याची इच्छा ही त्या विद्यर्थ्यांची असल्यामुळेच ते आज स्वत:च्या पायावर उभे आहेत. या अपंग, गतिमंद मुलांना गरज असते त्यांच्यातील सुप्त गुण बाहेर काढण्याची, तेच कार्य मी करत आहे. तसेच समोरची प्रत्येक व्यक्ती ही माझ्यासाठी आदर्श असतेच, कारण मी ज्या क्षेत्रात काम करते त्यासाठी अनेक लोकांना मी भेटते, गतिमंद मुलांसाठी काम करताना अनेक तज्ज्ञांची मते मी घेत असते, त्यामुळे माझ्यासाठीच मला भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही गुरूच असते असेही त्या सांगतात. जिद्द शाळेत मी काम करताना प्रत्येक गोष्टीत कठोर वागत होते, पण असे वागताना त्यातून प्रत्येकाला शिस्तच असावी, किंबहुना मी येथून गेल्यावर ती शिस्त तशीच राहावी असा माझा हेतू होता. शाळेतून बाहेर पडताना हे विश्व आता अनुभवयाला मिळणार नाही, असे वाटत असताना माझ्यासाठी अनेक संस्थांच्या संधी आल्या, त्यामुळे माझे कार्य हे संपले नाही ते सुरूच राहील याची खात्री पटली. त्यामुळे आनंद झाला. आज ठाणे, मुंबई, पुण्यात संस्थांना भेटी देताना अनेक माणसे भेटतात. खारघर येथील एनआयएमएच महाविद्यालयातील मुलांना मी शिकवले, त्यांच्याशी माझी अगदी कमी कालावधीत मैत्री झाली आणि अनेकांनी मी दिलेले सल्ले ऐकले आणि आज ते स्वत:च्या पायावर उभे आहेत ही कल्पनाच मनाला सुखावून जाते. क्षेत्र कोणतेही असो, त्यात मनापासून काम केले की आपल्याला मिळणारा आनंद आणि आपल्यापासून दुसऱ्यांना मिळणारा आनंद हा सर्वोच्च असल्याचे त्या सांगतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून शुभेच्छा स्वीकारताना मनाला एक आनंद मिळतो. ज्या विद्यार्थ्यांना घडविले आणि जे विद्यार्थी स्वावलंबी झाले हीच गुरूसाठी सर्वात मोठी भेट असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. त्यांच्या या कार्यामुळेच आजही जिद्द शाळेतच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शामश्री भोसले हे नाव ऐकले की त्यांचे कार्यच समोर उभे राहते. त्यांचे हे कार्य भविष्यात असेच सुरू राहील व त्यातून अनेक अपंग, गतिमंद मुलांचे आयुष्य नव्याने सुरू होईल यात शंका नाही.