एकीकडे तिजोरीत दमडी शिल्लक नसल्याचे सांगत नव्या अर्थसंकल्पात मोठय़ा प्रकल्पांना आयुक्तांनी कात्री लावली असताना दुसरीकडे पालिकेच्या तिजोरीतील पैसा ठाण्यातील नगरसेवकांना ‘खूश’ करण्यासाठी वाया घालवला जात आहे. शहरातील अनेक प्रभागांत दरवर्षी एकाच ठिकाणातील गटारे तसेच पायवाटांची कामे काढण्यात येत असून त्यावर लाखो रुपये खर्च केले जात असल्याचे पुढे आले आहे.
ठाणे शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये गटार आणि पायवाट आदी कामे करण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोटय़वधी रुपयांची तरतूद करण्यात येते. त्यानुसार, दरवर्षी विविध प्रभागांमध्ये गटार आणि पायवाटांची कामे करण्यात येतात आणि त्यावर निधी खर्च करण्यात येतो. मात्र, या कामाची कोणत्याही प्रकारे नोंद ठेवली जात नाही. त्यामुळे दरवर्षी एकाच ठिकाणची तीच तीच कामे पुन्हा केली जात आहेत. गेल्या तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गटार, पदपथांची कामे काढण्यात आली आहेत. त्यापैकी काही कामे पुर्ण झाली आहेत तर काही कामे अद्याप सुरू आहेत. मात्र, एकाच कामासाठी प्रतिवर्षी कामे काढण्यात येत असल्याचे निविदांवरून दिसून येते, असे माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्राहास तावडे यांनी म्हटले आहे.  
गेल्या पाच वर्षांत विविध प्रभागांमध्ये गटार आणि पायवाटा आदी कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदांच्या प्रती चंद्रहास तावडे यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांना पाठविल्या आहेत. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.