महसूल विभागाने सरकारी जागेवरील अतिक्रमणे तोडण्यास सोमवारी सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात विरारच्या कारगीलनगर परिसरातील दहा बेकायदेशीर चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या.
वसई-विरार शहरात पालिकेच्या आरक्षित भूखंडांसह सरकारी आणि वन जमिनींवर अतिक्रमणे झाली आहेत. चाळमाफियांनी या जागेवर बेकायदेशीर चाळी उभारल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने या चाळी फोफावल्या होत्या. वसई विभागाच्या प्रांतांनी या चाळी तोडण्याची मोहीम सोमवारी हाती घेतली. सोमवारी विरारच्या कारगिल भागातील चाळी तोडण्यात आल्या. रहिवाशांना यापूर्वी नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी घरे खाली केलेली नव्हती. त्यामुळे पोलीस बळाचा वापर करून ही घरे खाली करण्यात आली आणि मग चाळी तोडण्यात आल्या. सोमवारी दहा चाळी तोडण्यात आल्या. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.