कल्याण पश्चिमेतील रेल्वे न्यायालयासमोरील पदपथावर फेरीवाल्यांचा अक्षरश: सुळसुळाट झाला असून या भागातून चालणेही पादचाऱ्यांना कठीण होऊन बसले आहे. कपडय़ांच्या विक्रीची दुकाने या ठिकाणी थाटण्यात आली असून महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पदपथांवर बेकायदेशीरपणे धार्मिक स्थळांची उभारणी करण्यात आली असून त्यामुळे येथे फूल विक्रेत्यांचा वेढा पडलेला असतो.
कल्याण, डोंबिवली, भिवंडी भागातून येणारी सर्व वाहने गुरुदेव हॉटेल परिसरातून झुंझारराव बाजार, महालक्ष्मी हॉटेल या एकेरी मार्गिकेतून कल्याण रेल्वे स्थानकाच्या दिशेने येतात. तेथून ती मुरबाड रस्ता, वलीपीर रस्त्याने पुढे निघून जातात. या वाहनांमध्ये रिक्षांची संख्या सर्वाधिक असते. ही वाहने रेल्वे स्थानकापर्यंत आली की वाटेतच रिक्षांचा थांबा असल्याने तेथे कोंडी होते. पदपथांच्या बाजूला कचराकुंडय़ा आहेत. त्याच्या बाजूला चिखल असतो. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड होऊन जाते.
कल्याण रेल्वे स्थानकातून रेल्वे न्यायालयासमोरून बाहेर पडले की लिंबू सरबत, फळ विक्रेत्यांनी वाटेवरील जागेचा कब्जा केला आहे. त्याच्या बाजूला टांगेवाले, रिक्षा चालकांची ये-जा सुरू असते. रस्ता ओलांडल्यानंतर पदपथावर डाव्या बाजूला फूल विक्रेते, गजरे विक्रेते बसलेले असतात. याच पदपथावर एक धार्मिक स्थळ आहे. स्थळाला खेटून टपऱ्या आहेत. तेथून आणखी एक धार्मिक स्थळ पदपथावरच आहे. या स्थळाच्या पुढील पदपथ फेरीवाल्यांनी व्यापलेले असतात. संपूर्ण पदपथ कपडे, रेनकोट, पावसाळ्यात वापरायचे कपडे विक्रेत्यांनी वेढले आहे. या पदपथाखाली रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी, दुचाकी वाहने उभी करून ठेवण्यात येतात. त्यामुळे रेल्वे स्थानकासमोरील या रस्त्यावर सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत सतत वाहतूक कोंडी होत असते.
महापालिकेचे दुर्लक्ष
फेरीवाल्यांनी पदपथ अडवूनही ‘क’ प्रभागाचे पालिका अधिकारी, कर्मचारी येथील फेरीवाल्यांवर कारवाई करीत नाहीत. पदपथावर दुचाकी वाहने उभी करून ठेवण्यात येत असल्याने नागरिकांना पदपथावर चालणे शक्य होत नाही. लक्ष्मी भाजी बाजार, महालक्ष्मी हॉटेल परिसरात हे चित्र पाहण्यास मिळते. रेल्वे न्यायालयासमोर राज्य परिवहन महामंडळाचे आगार आहे. आगारात सतत बसची ये-जा सुरू असते. त्यात मुख्य रस्त्यावर वाहनतळ सोडून रिक्षा चालक व्यवसाय करीत असल्याने वाहतूक कोंडीत सर्वाधिक भर पडत आहे. कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांनी गेल्या सहा महिन्यांत रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले हटवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. आमदारांच्या आदेशालाही पालिका कर्मचारी दाद देत नाहीत. या सततच्या वाहतूक कोंडी, दरुगधीमुळे इमारतींमधील गाळ्यांमध्ये व्यवसाय करणारे व्यापारी हैराण आहेत.

कारवाई करू..
आपण अलीकडेच ‘क’ प्रभागाचा पदभार घेतला आहे. कल्याण रेल्वे स्थानक भागातील जेवढे पदपथ फेरीवाल्यांनी अडवले आहेत. नागरिकांना चालण्यास जेथे अडथळे आहेत. ते सगळे पदपथ मोकळे करण्यात येतील. पदपथ अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येईल.
-भरत जाधव , क  प्रभाग अधिकारी