पालिका कर्मचारी निवडणूक कामात व्यग्र; फेरीवाला हटाव पथकाकडून डोळेझाक
पालिका कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याचा लाभ उठवत फेरीवाल्यांनी डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते, पदपथ अडवून धंदा करण्यास सुरुवात केली आहे. फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या समोर फेरीवाले बसलेले असतात, पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. डोंबिवलीतील चिमणी गल्ली, फडके रस्ता, नेहरू रस्ता, उर्सेकरवाडी, पाटकर रस्ता, राजाजी रस्ता, मानपाडा रस्ता, इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. डोंबिवलीत या विभागांमध्ये संजय साबळे हे फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख आहेत. ते निवडणूक कामात व्यस्त आहेत. त्यांचे सहकारी सकाळ, संध्याकाळ कारवाई केल्याचा दिखावा करण्यासाठी वाहन बाजारात फिरवून आणत आहेत. या दिखावेबाज कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कल्याण रेल्वे स्थानक पश्चिम, पूर्व भागातील रस्ते, गल्लीबोळ फेरीवाल्यांनी व्यापून टाकले आहेत. स्कायवॉकवर पुन्हा फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. प्रभाग क्षेत्र अधिकारी, बाजार विभाग आणि फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांचे फेरीवाल्यांशी साटेलोटे असल्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत नसल्याचे सांगण्यात येते.
आयुक्त ई. रवींद्रन यांनी गेल्या महिन्यापूर्वी अचानक कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराला भेटी दिल्या होत्या. त्यामुळे घाबरलेल्या फेरीवाला हटाव पथकातील कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांना हद्दपार केले होते. परंतु, आयुक्त रवींद्रन यांचे लक्ष नाही. ते निवडणुकीत व्यस्त आहेत. याची जाणीव झालेला कर्मचारी पुन्हा फेरीवाल्यांना रस्त्यावर बसवून आपले ‘दुकान’ चालवू लागला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, वृद्ध मंडळी या फेरीवाल्यांनी व्यापलेल्या रस्ते, पदपथावरून चालायचे कसे असा सवाल करीत घरातून बाहेर न पडणेच पसंत करत आहेत. अनेकांना वाचनालयात, ग्रंथालयात जायचे असते. काहींना शतपावलीसाठी बाहेर पडायचे असते. परंतु, फेरीवाल्यांनी रस्ते जाम केले असल्याने रेल्वे स्थानक परिसरात सध्या फेरीवाला कोंडी पाहण्यास मिळत आहे.

दर आठवडय़ाला कर्मचारी बदलल्यास..
आयुक्त रवींद्रन यांनी दर आठवडय़ाला फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी बदलले तर कर्मचाऱ्यांच्या फेरीवाल्यांकडून घेण्यात येणाऱ्या हप्तेबाजीला आळा बसेल, असे काही कर्मचाऱ्यांनीच सांगितले.